बुमराह थेट IPL मध्ये खेळणार, इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतही विश्रांती मिळणार

हिंदुस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह थेट आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार नाही. तसेच आगामी टी-20 मालिकेमध्येही त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतही तो खेळणार नसून त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता सूत्रांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. असे झाल्यास तो थेट एप्रिल ते जून या कालावधीत होणाऱया आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

सर्वाधिक षटके टाकलीत

यूएईत झालेल्या आयपीएलनंतर हिंदुस्थानकडून सर्वाधिक षटके टाकणारा वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहचे नाव पुढे आले आहे. जसप्रीत बुमराहने या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 165.4 षटके गोलंदाजी केली आहे. त्यामुळे आगामी धकाधकीच्या वेळापत्रकाकडे लक्ष देता जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

क्षेत्ररक्षणाचा सराव

हिंदुस्थानचे खेळाडू चौथ्या कसोटीसाठी सज्ज होत आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मंगळवारी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला. मयांक अग्रवालने झेल पकडण्याचा तर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने थ्रोचा सराव केला. कुलदीप यादव व उमेश यादव यांनीही फिल्डिंगकडे गांभीर्याने लक्ष दिले.

इंग्लंड दौरा व टी-20 वर्ल्ड कप महत्त्वाचा

हिंदुस्थानचा संघ या वर्षी इंग्लंडचा दौरा करणार आहे. तसेच मायदेशात टी-20 वर्ल्ड कप या प्रतिष्ठsच्या स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. या दोन प्रमुख दौऱयांसाठी जसप्रीत बुमराह फिट असणे आवश्यक आहे. यासाठी जसप्रीत बुमराहला आराम देण्यात येत आहे.

रोहित, रिषभ, सुंदरला आराम

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील वन डे मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा, रिषभ पंत व वॉशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंची निवड न करता त्यांना आराम देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या