बुमराहच्या आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

टीम इंडियाचा क्रिकेटर जसप्रीत बुमराह याचे आजोबा संतोष सिंह बुमराह (८४) यांचा मृतदेह गुजरातच्या साबरमती नदीत सापडला आहे. उत्तराखंड येथून ते अहमदाबादला जसप्रीतला भेटण्यासाठी गेले होते. मात्र या दोघांची भेट झाली नाही. ते अहमदाबादहून निघून घरी पोहचले नाहीत या गोष्टीला काही दिवस गेले म्हणून पोलिसात संतोष सिंह बुमराह बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अहमदाबाद फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी साबरमती नदीतून संतोष सिंह यांचा मृतदेह बाहेर काढला आहे.

नातवाला भेटायला आलेले जसप्रीत बुमराहचे आजोबा बेपत्ता

कोट्यधीश जसप्रीत बुमराहचे आजोबा अन्नाला मोताद

कौटुंबिक कारणामुळे जसप्रीत बुमराह अनेक वर्षांपासून त्याच्या आईसोबत वेगळा राहत आहे. जसप्रीतची क्रिकेट कारकिर्द बहरत असताना त्याचे आजोबा मात्र हलाखीच्या परिस्थितीत जगत होते. मात्र जसप्रीत गुजरातमध्ये असताना त्याला भेटायचे म्हणून संतोष सिंह बुमराह अहमदाबादमध्ये गेले होते. पण शुक्रवारपासून त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नव्हता. अखेर संतोष सिंह बुमराह यांची मुलगी राजिंदर कौर यांनी वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. तपास सुरू असताना संतोष सिंह बुमराह यांचा मृतदेह साबरमती नदीमध्ये सापडला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या