लग्नाळू तरुणाची दोन लाखांची फसवणूक, जत पोलिसांनी तरुणाने पकडून दिलेल्या सहाजणांना दिले सोडून

प्रातिनिधिक फोटो

‘लग्नासाठी पुणे येथील वधू मिळवून देतो,’ असे सांगून जत तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने या रॅकेटमध्ये सामील असलेल्या संबंधित दोन एजंट व तीन तरुणींसह एका महिलेला पोलिसांच्या हवाली केले; परंतु फसवणूक झालेल्या तरुणाचे लग्न जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत न झाल्याने पोलिसांनी प्राथमिक तपास करून त्यांना सोडून दिले.

जत तालुक्यातील एका गावातील तरुणाने विवाह करण्यासाठी मुलगी मिळावी म्हणून एका व्यक्तीकडे संपर्क साधला होता. त्या व्यक्तीने पुण्यातील एका एजंटशी संबंधित तरुणाचा संपर्क करून दिला. त्या एजंटने देहू, आळंदी येथे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित तरुणाने एजंटांना दोन लाख रुपये दिले अन् सात दिवसांपूर्वी तरुणाचे लग्नही झाले.

लग्न होऊन पाच दिवस झाल्यानंतर नववविहित तरुणी पुणे येथे माहेरी जाते म्हणून गेली. तिला आणण्यासाठी तो पुण्याला गेला. यावेळी मुलगी तरुणासोबत पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर आली व लघुशंकेचे निमित्त करून बस स्थानकावरूनच पळून गेली. तरुणाने शोधाशोध करूनही कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्याने अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची फसवणूक कर्नाटक सीमाभागातील कनमडी व बिजर्गी येथेही झाल्याचे लक्षात आले. या ठिकाणी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील आमची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे सांगितले.

हे एजंट व बनावट लग्न करणाऱया तरुणी कर्नाटक येथील रायबाग येथे असल्याचे समजले. यावेळी फसवणूक झालेला तरुण व कर्नाटक व बिजरगी येथील तरुणांनी संबंधित एजंटांचे लोकेशन ‘जीपीएस सिस्टीम’द्वारे शोधून काढले. फसवणूक झालेल्या तरुणाने त्यांचा पाठलाग केला असता, ते जत तालुक्यातील एका ठिकाणी सापडले. या तरुणाने या सहाजणांना जत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी दोन्ही गटांकडील म्हणणे ऐकून घेतले. मात्र, हे लग्न जत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाले नसल्याने यावर कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याचे स्पष्ट करीत पोलिसांनी त्या सहाजणांना सोडून दिले आहे. त्यामुळे त्या तरुणाला वधूही मिळाली नाही आणि त्याचे दोन लाख रुपयेही गेले आहेत.