पोलीस हवालदाराच्या हत्येप्रकरणी माजी खासदाराला जन्मठेपेची शिक्षा

27 वर्ष जुन्या खून प्रकरणात माजी खासदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उमाकांत यादव असं या माजी खासदाराचे नाव असून पोलीस हवालदाराच्या हत्या प्रकरणातले ते मुख्य आरोपी होते. यादव यांच्यासह न्यायालयाने एकूण 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खुटहन विधानसभा मतदार संघातून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि मछली शहर मतदारसंघातून एकदा खासदार म्हणून निवडून आलेल्या उमाकांत यादव यांना 6 ऑगस्ट रोजी न्यायालयाने दोषी ठरवलं होतं.

4 फेब्रुवारी 1995 रोजी शाहगंज रेल्वे स्थानकात उमाकांत यादव यांच्या कारचालकाने म्हणजेच राजकुमार यादव याने पोलीस कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन केलं होतं. यामुळे त्याला पोलीस हवालदारांनी जीआरपी चौकीत बसवून ठेवलं होतं. राजकुमार हा त्याच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकात आला होता. आपल्या चालकाला पोलीस चौकीत बसवून ठेवल्याचं कळताच उमाकांत यादव रेल्वे स्थानकात पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीही होते. उमाकांत यादव आणि पोलीस कर्मचाऱ्यांची बाचाबाची झाली होती. ज्यानंतर शाहगंज रेल्वे स्थानकात गोळीबार झाला होता. या गोळीबारात पोलीस हवालदार अजय सिंह याचा मृत्यू झाला होता तर अन्य तीन जण जखमी झाले होते. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे रेल्वे स्थानकात प्रचंड गोंधळ झाला होता.

19 फेब्रुवारी 1996 पासून आजपर्यंत या खटल्याच्या एकूण 598 तारखा पडल्या होत्या. खटला सुरू असताना 19 साथीदारांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेनेही केला होता. जेव्हा ही हत्या झाली तेव्हा उमाकांत यादव हे बसपाचे आमदार होते. अपर जिल्हा न्यायाधीश शरद त्रिपाठी यांच्यापुढे हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी आले होते. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर त्रिपाठी यांनी यादव यांच्यासह एकूण 7 जणांना दोषी ठरवलं होतं.