अधिकारी जवानांना गुलामांप्रमाणे वागणूक देतात; जवानाचा नवा व्हिडिओ व्हायरल

97
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देवळाली येथे लांस नायक रॉय मॅथ्यू यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लष्करातील आणखी एका जवानाने आपल्या व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे. लष्करातील अधिकारी जवानांना गुलामाप्रमाणे वागणूक देतात. जवानाने अतिरिक्त सुटी घेतल्यास त्याच्याकडून जबरदस्तीने हलक्या दर्जाची कामे करून घेतली जातात, असे या जवानाने व्हिडिओत म्हटले आहे.
सिंधव जोगीदास नावाच्या एका जवानाचा हा व्हिडिओ असून हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलात जवानांचा सर्वाधिक छळ लष्करात होत असल्याचा दावा जोगीदास यांनी केला आहे. जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास त्याच्या तक्रारीची दखलही घेतली जात नाही. उलट त्यालाच शिक्षा देण्यात येते. पण आता माझ्याकडे पर्यायच नसल्याने मी हा व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट करत असल्याचे जोगीदास यांनी म्हटले आहे. आपल्यावर होणाऱ्या या अत्याचाराबददल पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयालाही पत्र लिहले. पण त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. मात्र लष्कराने  त्यानंतर माझी चौकशी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच लष्कराने जवानांना त्यांच्या तक्रारी ज्या व्हॉटसअॅप क्रमांकावर करण्यास सांगितल्या आहेत. त्या क्रमांकावर तक्रार करून काहीही उपयोग होत नसल्याचे जोगीदास यांचे म्हणणे आहे. सहाय्यकाचे काम करण्यास नकार दिल्याने माझी रवानगी सात दिवसांसाठी लष्कराच्या कोठडीत करण्यात आली. तिथे आपला अनन्वित छळ करण्यात आल्याचा आरोप या जवानाने व्हिडिओत केला आहे. सुट्टी वाढवल्याने माझा सात दिवसांचा पगारही कापण्यात आला. याबददल अधिकाऱ्यांना विचारता त्यांनी मलाच दोषी ठरवले. लष्करात अधिकारी तोंडी आदेश देत असल्याने या अधिकाऱ्यांविरोधात कुठलाही लेखी पुरावा माझ्याकडे नाही. यामुळेच मी सोशल साईटचा आधार घेतल्याचे या जवानाने व्हिडिओत म्हटल आहे.
जोगीदास २०१४ मध्ये लष्करात दाखल झाले होते. शिपाई आणि हाऊस किपर म्हणून ते काम करत होते. २०१५ मध्ये सुटी संपल्यानंतरही ते कामावर रुजू न झाल्याने त्यांचा ७ दिवसाचा पगार कापण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याविरोधात खटला सुरू असल्याने अंतिम निर्णय येईपर्यत त्याला थांबाण्यस सांगण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जवानांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा व्हिडिओ तेजबहादुर यादव या बीएसएफच्या जवानाने सोशल साईटवर पोस्ट केला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा चार जवानांनी आपल्या व्यथा मांडणारे व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट केले होते. जवानांच्या या भूमिकेमुळे सर्वेत्र खळबळ उडाली होती.
आपली प्रतिक्रिया द्या