सलाम! लग्न घटिका समीप आली, सनई चौघडे वाजू लागले; पण ‘तो’ सीमारेषेवरच

1104

देशाची सुरक्षा करण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभ्या असणाऱ्या जवानांना कोणत्या दिव्यातून जावे लागते हे ताज्या घटनेवरून दिसून येते. सीमारेषेवर छातीचे चिलखत करून उभा असणारा एक जवान स्वत:च्या लग्नालाही वेळेत पोहोचू शकला नाही. सीमाभागामध्ये सुरु असलेल्या तुफानी बर्फवृष्टीमुळे जवानाला जम्मू-कश्मीर सीमेवरच अडकून रहावे लागले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर लष्कराने या बातमीचा फोटो ट्वीट करून ‘जवानांसाठी सर्वात प्रथम देश आहे, जीवन त्याच्यासाठी वाट पाहील’, असे म्हटले आहे.

मूळचा हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील खैर गावचा रहिवासी असणारा जवान सुनील कुमार जम्मू-कश्मीरमध्ये देशसेवा बजावत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे सुनीलला सीमारेषेवरच अडकून रहावे लागले. 16 जानेवारीला सुनीलचे लग्न होते. मात्र स्वत:च्या लग्नातही तो वेळेत पोहोचू शकला नाही.

लग्नासाठी मुलाकडच्या आणि मुलीकडच्या कुटुंबीयांनी मोठी तयारी केली होती. घर सजवण्यात आले होते, मांडव टाकण्यात आला होता. दोन्हीकडचे पाहुणे जमले होते. अगदी सनई-चौघड्यावालेही तयार होते. सर्व लोग नवरदेवाची वाट पाहू लागले. सुनीलची सुट्टी 1 जानेवारीपासून सुरु होणार होती आणि काही दिवसांपूर्वीच बांदीपोरा येथील ट्रान्झिट कॅम्पला पोहोचला. मात्र खराब हवामानामुळे सर्व रस्ते बंद झाले. विमानही उड्डाण करू शकले नाही, त्यामुळे सुनीलने फोन करून आपण लग्नाला येऊ शकणार नाही असे घरच्यांना कळवले. नवरदेवच लग्नाला येणार नसल्याने सर्व नाराज झाले मात्र देशसेवेसाठी स्वत:चे लग्नही पुढे ढकलणाऱ्या मुलाचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया दोन्ही कुटुंबीयांनी दिली.

sunil

हिंदुस्थानी लष्कराने याबाबत रविवारी ट्वीट करून माहिती दिली. ‘लष्कराचा एक जवान कश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे स्वत:च्या लग्नालाही पोहोचू शकला नाही. परंतु चिंता करू नका, जीवन त्याच्यासाठी वाट पाहील. देश नेहमची सर्वप्रथम असणार आहे. नवरीकडील कुटुंबीयही नवीन तारखेला लग्नासाठी तयार आहे’, असे ट्वीट लष्कराने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या