मराठवाड्याला जलसंजीवनी मिळाली! जायकवाडी धरण 99.28 टक्के भरलं, 4 दरवाजे उघडले

बरोबर एक महिन्यानंतर जायकवाडी धरणाची दारे पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. धरण 99.28 टक्के भरले असून रविवारी संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी 4 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करण्यात आले आहेत. यातून गोदापात्रात प्रतिसेकंद 4 हजार क्युसेकचा विसर्ग केला जात आहे. नाथसागरात सध्या 9 हजार क्युसेकचा जलौघ नव्याने दाखल होत आहे.

‘हैड्रो’सह दोन्ही कालवेही सोडले…
शनिवारी धरणाच्या जलविद्युत प्रकल्प (हैड्रो) मधून 1 हजार 589 क्युसेक तर डावा-उजवा या दोन्ही कालव्यांतून एकूण 1 हजार 600 क्युसेक एवढा जलविसर्ग सुरू केला होता. आज नाथसागरात 100 टक्के पाणीसाठा झाल्यावर धरणाची दारे उघडण्याचा निर्णय जलसंपदा प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती जायकवाडी (उत्तर) येथील कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली. तत्पूर्वी गोदावरीच्या काठावर वसलेल्या पैठण शहरासह 18 गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापुराची स्थिती उद्भवणार नाही, अशा पद्धतीने धरणातून जलविसर्ग केला जाणार असला नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे.

‘वर’चे प्रकल्प तुडुंब !
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील धरण-समुहांतून सध्या 9 हजार क्युसेक एवढा जलौघ नाथसागरात सोडला जात आहे. 1522 फूट जलसाठवण क्षमता असलेले हे महाकाय धरण महिनाभरापासून तुडूंब भरलेले आहे. नाशिक व नगर भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर 28 जूलै पासून जायकवाडीची पाणीस्थिती सुधारत गेली आणि ‘डेडस्टोअरेज’ मध्ये असलेला पाणीसाठा 5 व्या दिवशीच 3 ऑगस्ट रोजी जिवंत पाणीसाठ्यात रुपांतरीत झाला. ‘वरच्या’ भागातील सर्वच धरणे काठोकाठ भरल्यानंतरही नाथसागरात पाण्याची आवक चालूच राहिल्यावर 15 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले होते. 13 दिवस हा जलविसर्ग अहोरात्र चालूच होता. अखेर 28 ऑगस्ट रोजी धरणाची दारे बंद करून विसर्ग थांबवण्यात आला. या पार्श्वभूमीवर 18 दिवसानंतर पुन्हा जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागले आहेत. रविवारी संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी प्रकल्पाचे 4 गेट प्रत्येकी 6 इंच वर करून गोदापात्रात जलविसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता बुद्धभुषण दाभाडे यांनी दिली. नाथसागरात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन रात्री उशिरा जलविसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे.

13 दिवसांचा जलविसर्ग, 5 जिल्ह्यांना लाभ अन् ..!
15 ते 28 आँगस्ट या 13 दिवसांत सोडलेल्या पाण्याचा लाभ संभाजीनगर, जालना, परभणी, नगर, बीड व नांदेड या 5 जिल्ह्यांना मिळाला. मराठवाड्याला अक्षरशः जलसंजीवनी प्राप्त झाली. जायकवाडीतून सोडलेल्या या पाण्यामुळे गोदावरी वरील पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी या बंधाऱ्यांसह तब्बल 32 निम्न बंधाऱ्यांमध्ये काठोकाठ पाणी साठले आहे. 208 किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील 1 लाख 41 हजार 640 हेक्टर शेतजमिनी ओलिताखाली आल्या. तर 132 किलोमीटर लांब असलेल्या उजव्या कालव्यातून 46 हजार 640 हेक्टर एवढे सिंचन झाले. याशिवाय गोदावरीच्या तिरावर वसलेल्या शेकडो गावातील लाखो जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या