जायकवाडी 90 टक्के भरले, दरवाजे उघडणार

नाशिक, नगर भागातील सर्व 9 धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे नाथसागर जलाशयात 16 हजार क्युसेसप्रमाणे पाण्याचा जलौघ येत असून प्रकल्प तुडुंब भरण्यासाठी केवळ 10 टक्के पाण्याची गरज आहे. 90 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे आवाहन करणारे पत्र कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नगर व नांदेड या जिह्याच्या जिल्हाधिकाऱयांना पाठवले आहे.

जायकवाडी धरणाच्या निम्न बाजूचे आपेगाव, हिरडपुरी, जोगलादेवी, मंगरुळ, राजाटाकळी, लोणी व सावंगी या गोदावरीवरील उच्च पातळी बंधाऱयांचे दरवाजेसुद्धा कोणत्याही क्षणी उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे खबरदारी म्हणून जायकवाडी धरण व गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱयांच्या निम्न बाजूच्या गोदावरी किनाऱयालगतच्या गावातील नागरिकांना सतर्प राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
बीड 61
छत्रपती
संभाजीनगर 47
जालना 29
लातूर 31
धाराशिव 16
नांदेड 45
परभणी 50
हिंगोली 26