पुणे विधान परिषद निवडणूक – फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट

स्वपक्षातील निष्ठावंतांना डावलायचे, इतर पक्षात फोडाफोडी करून उमेदवार आयात करून त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करून राजकीय पोळी भाजून घेण्याची भाजपची पश्चिम महाराष्ट्रातील रणनीती पदवीधर निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या मुळावर आली आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या पराभवानंतर आज झालेल्या पदवीधर मतदारसंघातील संग्राम देशमुख यांच्या पराभवाने पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर ही दुसरी निवडणूक जिंकून भाजपला जागा दाखवून दिली आहे.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग बारा वर्षे पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पदवीधर ची जागा भाजपने गमावली. चंद्रकांत पाटील हे गेले काही महिने शड्डू ठोकून पदवीधरची जागा मिळणार या अविर्भावात होते.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देखील पाटील यांचा तोरा कायम होता. गेल्या छत्तीस वर्षांमध्ये जनता दलाचे शरद पाटील यांचा सहा वर्षांचा एकमेव अपवाद वगळता पाच वेळा या मतदारसंघावर भाजपने राज्य केले. यावेळी भाजपाने स्वपक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांऐवजी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील नेते आयात करायचे आणि एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवायला लावून संधीसाधूपणा चे राजकारण भाजप कडून होत राहिले. परंतु यावेळी सुशिक्षित पदवीधरांनी भाजपला नाकारले. दुसरीकडे महा विकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून हा पहिला दणदणीत विजय नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी तब्बल 48 हजार 824 मतांनी पहिल्या पसंतीच्या फेरीतच भाजपचे संग्राम देशमुख यांना अस्मान दाखवले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव मानहानीकारक आणि तेवढाच आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

शिक्षक मतदारसंघांमध्ये नेहमीच बदल राहिला आहे. या खेपेला महाविकासआघाडीचे प्रा. जयंत आसगावकर विजय घोषित झाले. या मतदारसंघात भाजपा फारसा प्रभाव टाकू शकले नाही. अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला परंतु पवार तिस्रया क्रमांकावर फेकले गेले .माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्याबरोबर लढत झाली. महा विकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांमध्ये असलेले वर्चस्व या निवडणुकीत दिसून आले. शिक्षक संघटनांचा प्रभाव यावेळी कमी झाला. राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली महाविकासआघाडी ने शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जिंकली हे वेगळेपण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या