महायुती सरकारने 94 हजार कोटींचा भुर्दंड महाराष्ट्राच्या माथी मारला; जयंत पाटील यांचा घणाघात

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या नावाखाली फुगीर आकडे सांगून मायबाप जनतेची फसवणूक करण्याचे काम राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. परंतु यामुळे राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचं काम महायुती सरकार करत आहे. या ढोंगीपणाला महाराष्ट्रातील जनता मुळीच थारा देणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पाची चिरफाड केली. जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

अजितदादांनी 6 लाख 70 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर आज 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. 20 हजार कोटींचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. म्हणजे आता 1 लाख 14 हजार कोटींची तूट झाली. हे 94 हजार कोटी खर्च केल्यावर आता 4.3 टक्क्यांवर राज्याची आर्थिक तूट जाईल. राज्याचा खर्च इतका वाढलेला आहे की राज्य जे कर्ज काढतं बॉण्ड्सवर त्याचंही रेटींग कमी झाल्यामुळे आपल्याला व्याजाचा दर वाढेल. म्हणजे एका आर्थिक दुष्टचक्रात आपण सरकारला अडकवतोय. अर्थमंत्र्यांनी आतापर्यंत दहावेळा अर्थसंकल्प माडलेले आहेत. त्यामुळे नऊ वेळा जे केलेलं नाही ते दहाव्यांदा तुमच्यामुळे करावं लागतंय. नऊ वेळा त्यांनी कधीही अर्थसंकल्पात असा गोंधळ केलेला नाही. पण यावेळी एवढा प्रचंड अर्थसंकल्प मांडल्यावर परत 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच हा अर्थसंकल्प सरकारने मांडला आहे. या पुरवणी मागण्या मांडून नयेत, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. तसेच ही आर्थिक गोंधळ निर्माण करणारी प्रवृत्ती आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाची चर्चा न करता मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्ताधारी पक्षांनी गोंधळ केला. सत्ताधारी पक्षाला आज चर्चा होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे जाणीवपूर्व महाराष्ट्राच्या माथ्यावर 94 हजार कोटींचा नवा भुर्दंड पुरवणी मागण्यांमार्फत मांडण्यात आला. ज्याला विरोधी पक्ष विरोध करतील, याची खात्री असल्यामुळे हा पळपुटेपणा महायुती सरकारने केलेला आहे, असा घणाघात जयंत पाटील यांनी केला.