महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला दिसत नाही त्यामुळेच महाराष्ट्रात अशाप्रकारे घटना घडत आहे. बदलापूर मध्ये झालेले घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो. तसेच तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो, आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही कायद्याचं भय कुणालाही राहिलं नाही. कोणताही गुन्हा केला तर त्यातून आपण सहज निघून जाऊ शकतो अशी धारणा गुन्हेगारी वृत्ती असलेल्या व्यक्तीकडून सध्या महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळेच आज बदलापूर मध्ये सरकार विरोधात लोकांची असलेली भावना या आंदोलनाच्या रूपाने बाहेर आली आहे. बदलापूर मध्ये झालेल्या या घटनेत बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पोलिसांच्या आणि शाळेच्या कृती याबाबत सरकारने ताबडतोब कारवाई करावी अशी आमची मागणी आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, बदलापूर घटनेमध्ये दोन चार पोलीस अधिकारी आणि शाळेवर कारवाई करण्यात आली असली म्हणजे त्यांना शिक्षा झाली असे आम्ही मानत नाही. पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करणे शाळेवर कारवाई करणे हे केवळ आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सरकारचा दिसत आहे. आमचं म्हणणं आहे की, यात कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांकडून या कुठल्याही कृती केली नाही याचा जवाब देखील विचारला पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा हा गंभीर विषय झाला आहे. नागपूर मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलीस जुगार खेळत बसलेले असतील. तर मग महाराष्ट्रातील महिलांना वाचवण्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस कार्यरतच नाही. महाराष्ट्रात खरी गरज महिलांना सुरक्षितेची गरज आहे. परंतु महाराष्ट्रातील सरकार महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे यातून पुन्हा सिद्ध होत आहे असे जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले आहे.