पेपरफुटीचा रोग आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य

<<जयेश राणे>>

पेपर फोडणारे आणि त्यांची विक्री करणारे यांचा शोध घेतेवेळी पोलिसांच्या जाळय़ामध्ये काहीजण सापडतात, तर या घोळामध्ये सहभागी असूनही निसटण्यात काहीजण यशस्वी होतात. पेपरफुटीची जेवढी प्रकरणे समोर येतात तेवढय़ा प्रकरणांचा जरी विचार केला तरी यातील आर्थिक उलाढाल किती असू शकते याची कल्पना करता येईल. जी प्रकरणे समोर येत नाहीत त्यातील चोर चोरी पचवण्यास तात्पुरते तरी यशस्वी होतात. अशा निसटलेल्या चोरांची लबाडी पकडण्यासाठी कंबर कसावीच लागेल. पेपर फोडणाऱ्या टोळक्यांचे बिंग फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढे येणे आवश्यक आहे.

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांतील पेपरफुटीचे प्रकरण प्रतिदिन नवीन माहिती समोर घेऊन येत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीचीही परीक्षा या वर्षी पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे चर्चेत राहिली. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांनी तर कहरच केला होता. पेपरफुटीच्या घटनांवरून शिक्षण क्षेत्रातील नीतिमत्ता लोप पावत चालली असल्याचे लक्षात येते.

सीबीएसई बोर्डाच्या काही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने ‘पेपरफुटी’ हा विषय देशात चर्चिला गेला. केंद्रीय शिक्षण मंडळालाही बसलेला हा फटका लक्षात घेता राज्यांतील शिक्षण मंडळांत काय स्थिती असेल? त्यातही विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या शिक्षण मंडळांची स्थिती काय असेल? एकंदरीत हा सर्व गोंधळ सुरू असला तरी त्याकडे आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांचे बारीक लक्ष असते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा परिणाम उच्चशिक्षणासाठी हिंदुस्थानातून जे विद्यार्थी विदेशात जातात त्यांच्या तेथील शैक्षणिक प्रवेशावर होऊ शकतो. पेपरफुटीच्या घटना म्हणजे देशासाठी आंतरराष्ट्रीय अपकीर्तीचे एक माध्यम बनणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.

कुंपणच शेत खाते तेव्हाच त्याची नासाडी होते आणि कुंपण जेव्हा नावाप्रमाणेच शेताच्या संरक्षणाचे अभेद्यपणे काम करते तेव्हा शेताची नासाडी कोणत्याही कठीण स्थितीत अशक्यच असते. पेपरफुटीच्या प्रकरणांवर विद्यापीठे आणि शिक्षण मंडळे यांना उपयुक्त उपाय शोधता न येणे हे परीक्षा यंत्रणेसमोरील बिकट आवाहनाची तीव्रता स्पष्ट करते. एखादा गंभीर संसर्गजन्य आजार सर्वत्र पसरल्यावर अनेकांना त्याचा त्रास होतो. काहींना तर प्राणही गमवावे लागते. थोडक्यात काय तर तो आजार व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी करतो. तशाच स्वरूपाचा गंभीर असा संसर्गजन्य आजार ‘शिक्षण व्यवस्थे’ला जडल्याने पेपरफुटीच्या प्रकरणांना उधाणच आले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

परीक्षेच्या कालावधीत पेपरफुटीची प्रकरणे जेव्हा उघडकीस येत असतात तेव्हा त्याचा ताण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर येतोच येतो. फुटलेल्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार का, असा चिंताजनक विचार यामागे असतो. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र या विषयाची फेरपरीक्षा देशातील काही भागांसाठी होणार आहे. हा प्रामाणिक विद्यार्थ्यांवरील अन्याय नव्हे का? प्रामाणिक विद्यार्थी पेपरफुटीच्या घटनांना वैतागलेला आहे. त्याला न्याय हवा आहे. तो न्याय मिळवून देणे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे. फेरपरीक्षेसाठी शिक्षण मंडळाला येणारा खर्च, विद्यार्थ्यांची होणारी फरफट, पेपर तपासणीचे बिघडणारे नियोजन परिणामी उशिरा निकाल लागल्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणारा विलंब अशी एक साखळीच पेपरफुटीच्या घटनांमुळे उदयास येते. हे टाळण्यासाठी परीक्षा पेपरफुटीमुक्त वातावरणात पार पडणे महत्त्वाचे आहे.

पेपर फोडणाऱ्या शिक्षणद्रोह्यांच्या दुष्कृत्यांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत असते. ही दुःस्थिती कधी थांबणार?आगामी शैक्षणिक वर्षांतील परीक्षा पेपरफुटीमुक्त वातावरणात होण्यासाठी कठोर उपाययोजनांचा अवलंब केल्याविना पर्याय नाही. पेपरफुटीच्या प्रकरणांविषयी चौफेर टीका होत असल्याने टीकाकारांना तात्पुरते शांत करण्यासाठी काही तरी उपाययोजना करत असल्याचे दाखवणे अयोग्यच ! यामुळे प्रतिवर्षी पुनःपुन्हा पेपरफुटीची अडचण गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने डोक वर काढू शकते. एका बाजूला विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देतात, तर दुसऱ्या बाजूला पेपर फोडणारे पेपर विक्रीचा बाजारच परीक्षा कालावधीत उघडतात.

पेपरफुटीच्या प्रकरणांत खासगी शिकवणी हे सूत्र विशेष गाजत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन या सूत्राचा कायमचा सोक्षमोक्ष हा लागला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये मंडळाच्या नियमानुसार प्रश्नपत्रिकांच्या पाकिटाचे सील उघडण्यात येत आहे का, याची पडताळणी करत रहाणे ही शाळा व्यवस्थापनाचीही जबाबदारी आहे. पर्यवेक्षक नियुक्त केला म्हणजे सर्व जबाबदारी तो सांभाळेल असे गृहीत धरून चालत नाही. आपल्या शाळेत काय चालते याकडे शाळा व्यवस्थापनाचे लक्ष असणे अत्यावश्यक आहे. असे केल्यास पुढील गुन्हा सहजपणे टळू शकतो आणि गुन्हेगाराचे मनसुबे उधळून लावण्यात यशही प्राप्त करता येऊ शकते. आजमितीस गुन्हेगार आपल्या डावपेचांत यशस्वी होत आहेत आणि हेच थांबवायचे आहे.

पेपर फोडणारा आणि त्याची खरेदी करणारा हे दोघेही गुन्हेगारच होय! शालेय वयापासूनच एक प्रकारे भ्रष्टाचाराची सवय जडलेला विद्यार्थी भविष्यात काय करणार ? पेपर खरेदी करणारेही (विद्यार्थी) असल्याने त्यांची विक्री करून परीक्षा कालावधीत बक्कळ कमाई करणारेही आहेत. पेपर खरेदीसाठी पैशांची जुळवणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हुशार विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेवून जिद्दीने अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे. पेपर फोडणारे आणि त्यांची विक्री करणारे यांचा शोध घेतेवेळी पोलिसांच्या जाळय़ामध्ये काहीजण सापडतात, तर या घोळामध्ये सहभागी असूनही निसटण्यात काहीजण यशस्वी होतात. पेपरफुटीची जी प्रकरणे समोर येतात तेवढय़ा प्रकरणांचा जरी विचार केला तरी यातील आर्थिक उलाढाल किती असू शकते याची कल्पना करता येईल. जी प्रकरणे समोर येत नाहीत त्यातील चोर चोरी पचवण्यास तात्पुरते तरी यशस्वी होतात. अशा निसटलेल्या चोरांची लबाडी पकडण्यासाठी कंबर कसावीच लागेल. पेपर फोडणाऱ्या टोळक्यांचे बिंग फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा घटनांच्या मुळाशी जाणे तपास यंत्रणांनाही सोपे जाईल. मूल्य शिक्षणाचे धडे शाळा-महाविद्यालयांतून दिले जातील. पण ती मूल्ये विद्यार्थ्याने स्वतःत रुजवल्यासच त्याचा उत्कर्ष आणि पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष आहे