नेमेचि होते पाणीटंचाई

 <<जयराम देवजी>>

पाणी हा शाश्वत विकासाचा पाया आहे. शेती आणि उद्योगव्यवस्था ही याच पायावर उभी आहे. अनियमित पावसाळा, पाण्याची कमी उपलब्धता, पाण्याचे सम (अ) न्यायी वाटप, पाण्याचा चुकीचा वापर, पाण्याची घसरती उत्पादकता, पाण्याचे प्रदूषण आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी समाजाची निक्रियता या सर्व बाबींमुळे पाणी प्रश्न अधिकाधिक दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. मान्सून ही आपली समस्या नसून पाणी जमा करणे ही आपली समस्या आहे. पुढील दोन वर्षे पुरेल इतका पाऊस दरवर्षी पडतो, पण आपण त्याचे संकलन करीत नाही.

पूर्ण हिंदुस्थानात केवळ १० टक्के पाण्याचे संकलन होते. उर्वरित ९० टक्के पाण्यापैकी अर्धे पाणी हे बाष्पीभवनाने नाहीसे होते तर अर्धे पाणी समुद्राला जाउैन मिळते. वाढत्या उष्णतेला काटशहा देण्यासाठी आपल्याला वनस्पतींमध्ये वाढ करण्याची गरज आहे. तिथे आपण खूपच कमी पडतो आहोत. वृक्षराजीसंवर्धन ही बाब आपल्या मनाने स्वीकारली पाहिजे आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीही झाली पाहिजे. वृक्ष जल पुनर्भरणासाठी मदत करतात. वाहून जाणारे पाणी झुडपांपाशी अडते. झुडपांमुळे जनावरांना चारा मिळतो. वृक्षराजी पर्जन्यमानाला स्थिर करतात. हवेला अडथळा निर्माण करून बाष्पीभवनाचा दर कमी करतात. या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. कोटीच्या कोटी झाडे लावण्याची आपण वल्गना करीत आहोत. झाडे लावणे व वेगळे आणि ती जगवणे वेगळे. आपण जी जगवण्यात कमी पडत आहोत.

आज सरकारी खात्याजवळ, नगरविकास निगमकडे अगणित अशी एकर जमीन रिकामी पडली आहे. रस्ते, रेल्वे मार्ग यांच्या दुतर्फा वृक्षांची वानवा आहे. आज समाजात स्वेच्छेने कार्य करण्यासाठी अगणित संस्था तयार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून अशी एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे की, वृक्ष लागवड वाढेल आणि बाष्पीभवनावर पायबंद बसेल. दिवसेंदिवस उष्णता वाढत जाणार आहे. हे थांबवायचे असेल तर आपल्याकडून वृक्षसंवर्धनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पाण्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर होणे आवश्यक आहे. हा विचार केवळ उन्हाळय़ाच्या पूर्वसंधेला अनुसरून वा चर्चा करून चालणार नाही. तर कायमस्वरूपी हे जीवनसूत्र बनले पाहिजे. याखेरीज पाण्याचे वाटपही (न्याय) गरजेचे आहे. नाही तर एका वस्तीत २४ तास पाणी आणि दुसरीकडे टँकरने पाणीपुरवठा हे चित्र बदलण्याची गरज आहे.