जयसिंगपूर पोलिसांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करा, वीज कर्मचार्‍यांची मागणी

433

वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी गेलेल्या अभियंता व कर्मचार्‍यांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार्‍या जयसिंगपूर ठाण्यातील पोलिसांवर ‘सरकारी कामात अडथळा’ आणल्याचा गुन्हा नोंद करण्याची मागणी वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृति समितीच्या जयसिंगपूर विभागीय कार्यालयाने केली आहे. अशी कार्यवाही न झाल्यास व यापुढे पोलिसांनी सहकार्य न केल्यास सोमवार दि. 6 एप्रिलपासून संघटनेचे सर्व सभासद कामावर जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला आहे.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून वीज अभियंता प्रवीण सुरवशी व जनमित्र अविनाश बोरसे हे दानोळी (ता. शिरोळ) येथील खंडित वीज पूर्ववत करण्यासाठी गेले होते. तेथून परतताना जयसिंगपूर बसस्थानकाजवळ साध्या वेशातील एकाने त्यांना अडवून कागदपत्रांची मागणी केली होती. वाहनावर अत्यावश्यक सेवेचे स्टीकर होते आणि तहसील परवानाही होता. तरीही या कर्मचार्‍याने त्यांच्याकडून दंड वसूल केला. मात्र, त्याचवेळी तेथून जाणार्‍या अन्य वाहनांना सोडून दिले. पोलिसांच्या या असहकार्याच्या भूमिकेमुळे वीज कर्मचार्‍यांत असंतोष निर्माण झाला आहे, असे याबाबत वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या कार्यकारी अंभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचार्‍यावर जाणीवपूर्वक सरकारी कामात अडथळा आणल्याची कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा करावा, पोलिसांना आम्हाला सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा दि. 6 एप्रिलपासून वीज कर्मचारी घरी बसून काम पाहतील आणि विजेबाबत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर विभागीय सचिव किरण कदम, सलीम सुतार, इकत्यार मुल्लाणी यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती कोल्हापूर एमएसई सहसचिव, मंडळ अध्यक्ष, जयसिंगपूर पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या