जयसिंगपुरातील मशिदीत ठाण्यातील लोकांचा रहिवास, प्रशासनाने केला खुलासा

1226
फोटो- प्रातिनिधीक

मनोज पोटे, जयसिंगपूर

होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेल्या मुंबई-ठाण्याकडील नऊ मुस्लिम व्यक्तींसह अन्य चारजण जयसिंगपुरातील एका मशिदीमध्ये गेल्या सुमारे आठवड्यापासून वास्तव्यास आहेत. या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून केवळ संचारबंदीमुळे त्यांना येथून जाता येत नसल्याने ते येथे राहिले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, या व्यक्ती मशिदीत कुलूपबंद असून त्यांच्याविषयी अन्य कोणतीही माहिती मिळत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट आहे. या व्यक्तींपासून धोका नसल्याचा निर्वाळा स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलिस का देत नाहीत, असा सवाल करीत सध्या या भागात कुरबुरी सुरू आहेत.

‘लॉकडाऊन’च्या गेल्या सुमारे 15 दिवसांच्या काळात दिल्लीतील मरकज प्रकरणामुळे देशभरात कोरोना फैलावल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मरकजसाठी दिल्लीला गेलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग होता, हेही उघड झाले आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या अनेकजणांचा देशभरात शोध सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांत अनोळखी व्यक्ती मशिदींच्या आसपास दिसल्यास चर्चेला ऊत येत आहे.

राजीव गांधी नगर या जयसिंगपूर शहराच्या उत्तर-पश्‍चिम भागात असणार्‍या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमधील एका मशिदीमध्ये गेल्या सुमारे आठ ते दहा दिवसांपासून अशाच अनोळखी व्यक्ती रहावयास आल्या आहेत. या मशिदीत पूर्वीपासूनच चार व्यक्ती रहावयास होत्या. त्यात या व्यक्तींची भर पडल्याने त्यांची संख्या 13 झाली. या मशिदीच्या सभागृहात त्यांची सोय करण्यात आली आहे. मशिदीच्या परिसरातीलच स्थानिकांकडून त्यांच्या जेवण्याची, चहा-नाष्ट्याची सोय करून हे सभागृह कुलूपबंद केले जात आहे.

मशिदीत राहण्यास आलेल्या व्यक्ती कुठल्या, त्या जयसिंगपुरात कशासाठी आल्या होत्या, आदिंबाबतची कोणतीही माहिती तेथील नागरिकांना नसल्याने राजीव गांधी नगरमधील या परिसरात घबराट पसरली आहे. स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर येथील महिला सातत्याने प्रश्‍नांचा भडिमार करीत आहेत. ‘एवढी गुप्तता का?’ या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने येथील नागरिकांत अस्वस्थता आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी संपला, की हे सर्वजण येथून जातील, असेच सांगण्यात येत आहे. मात्र, येत्या काळात छोट्या कुरबुरीचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ नये, यासाठी पोलिस व प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

‘त्यां’ची तपासणी पूर्ण

याबाबत तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता राजीव गांधी नगरमधील मशिदीत राहिलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. शहरातीलच एका घरात सुमारे 21 दिवस ते क्वारंटाईनमध्ये होते. दरम्यान, संचारबंदी लागू झाली. त्यामुळे त्यांच्या मूळ गावी परतता येत नसल्याने ते येथे राहिले आहेत. कोणत्याही अफवेला बळी न पडता सर्व गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. मात्र, होम क्वारंटाईन असतानाही कोणी बाहेर फिरत असेल, तर तात्काळ थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार मोरे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या