लाच स्वीकारताना शहापूरच्या तलाठ्यासह पंटरला रंगेहाथ पकडले

1428

शहापूर येथे प्लॉट खरेदी केल्यावर सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जयसिंगपूरचा रहिवासी असलेल्या तलाठ्यासह पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तलाठी प्रवीणकुमार बाळासाहेब तोडकर (वय 41, रा. दत्त कॉलनी, जयसिंगपूर) व पंटर सिदगोंडा लक्ष्मण डंगे (वय 36, रा. शहापूर) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली आहे.

तक्रारदाराचे मित्र नोकरीनिमित्त पुणे येथे राहात आहेत. शहापूर येथे त्यांनी प्लॉ़ट खरेदी केला आहे. या प्लॉटच्या मालकी हक्कात सातबारा पत्रकी नाव नोंद नव्हती. ही नोंद करण्यासाठी संबंधितांनी तक्रारदारास संमतीपत्र दिले आहे. तलाठी प्रवीणकुमार तोडकर यांच्याशी तक्रारदाराने भेटून कामाबाबत चौकशी केली. यावेळी तलाठी तोडकर यांनी त्यांच्याकडे काम करणारा खासगी व्यक्ती सिदगोंडा डंगे याला भेटण्यास सांगितले. भेटीनंतर तक्रारदाराने माझ्या मित्राचे काम बरेच दिवसांचे जुने आहे, ते करून द्या, अशी विनंती केली.

सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी तलाठी तोडकर यांना 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे डंगे यांनी सांगितल्यावर रक्कम खूपच जास्त होते, काहीतरी तडजोड करा, असे तक्रारदाराने सांगितले. यावेळी डंगे याने तलाठीसाहेबांना तुम्ही जयसिंगपूर येथे त्यांच्या घरी जाऊन भेटा व पैशांबाबत बोलून घ्या, असे सांगितले. यानंतर त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास तक्रारदार तलाठी तोडकर यांच्या भेटीसाठी जयसिंगपुरातील दत्त कॉलनी येथील त्यांच्या घरी आले. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा लावला. तलाठी तोडकर याच्यासाठी लाचेच्या एकूण रकमेपैकी पाच हजार रुपये स्वीकारताना सिदगोंडा डंगे याला रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या