जेडीयू-काँग्रेस राजकीय घटस्फोटाच्या तयारीत

16

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदासाठी भाजपप्रणीत एनडीएने घोषित केलेले उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय संयुक्त जनता दलाने घेतल्यामुळे बिहारमधील जेडीयू, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या सरकारवर अस्थिरतेचे ढग दाटून आले आहेत. दलिताच्या मुलीला हरवण्यासाठी नितीशकुमारांनी हिरीरीने प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसने केली आहे. त्यावर काँग्रेसपेक्षा भाजपची संगत बरी होती, असे प्रत्युत्तर संयुक्त जनता दलाने दिल्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.

कोविंद यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल व संयुक्त जनता दल या तीन पक्षांमध्ये तीन तिघाडा होण्याच्या मार्गावर आहे. कोविंद यांच्या विरोधात काँग्रेसने मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र बिहारचे असूनही नितीशकुमारांनी मीरा कुमार यांच्याऐवजी कोविंद यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसने नितीशकुमारांवर टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देत संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी काँग्रेसपेक्षा भाजपशी असलेली राजकीय संगत केव्हाही चांगलीच होती अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

राजकीय भूकंपाची शक्यता
या घडामोडींमुळे आगामी काळात पुन्हा भाजप व संयुक्त जनता दलामध्ये दिलजमाई होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असून राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपल्यानंतर बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या