केंद्रीय राखीव दलाची जीप व ट्रॅव्हल्सच्या अपघातात एक जवान ठार, दोन जखमी

65

सामना प्रतिनिधी । लातूर

नांदेड हायवेवर आष्टामोडला जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात जोराची धडक होऊन एक जवान ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

लातूर येथील केंद्रीय राखीव दलातील जवान फायरिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी लातूरहून चाकूरकडे येत असताना जवानांना घेऊन जाणारी जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात जोराचा अपघात झाला. त्यात एक जवान ठार तर दोन जवान गंभीर जखमी झाल्याची घटना चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील रेल्वेस्थानकाजवळ २२ रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे.

लातूर येथील सीआरपीएफ केंद्रातील जवान फायरिंगचे प्रशिक्षण सराव करण्यासाठी चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात येत होते. जवानांची के.एल.२२ बी. ८३८७ जिप्सी जीप आष्टामोड रेल्वे स्थानकासमोरील वळनावर एम.एच. ३८ एफ. ५३३३ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात जिप्सी चालक जितेंद्र चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर सहाय्यक कमांडन्ट गंभीरसिंग यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाले असून जवान देशमुख हेही जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाची रुग्णवाहिकेसह दोन डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचून जखमींना लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या