जब्बार पटेल, ज्योती चांदेकर यांना जीवनगौरव

30

सामना ऑनलाईन, मुंबई

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचा यंदाचा कै. निखिलभाऊ खडसे  जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सोहळा १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता नाटय़संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडेल.

नाटय़ परिषदेने आज विविध पुरस्कारांची घोषणा केली. तसेच मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील पुरस्कारांसाठी नामांकनेही जाहीर केली आहेत. या विजेत्यांची नावे पुरस्कार सोहळ्यात जाहीर होतील. सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी रमेश थोरात, नाटय़ परिषद कार्यकर्ता पुरस्कारासाठी ऍड. देवेंद्र यादव, नाटय़समीक्षक पुरस्कारासाठी शांता गोखले, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था परिवर्तन नाटय़संस्था, जळगाव आणि बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी नयना डोळस यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकासाठी ‘एमएच १२ जे १६’, सर्वेत्कृष्ट संगीत नाटकासाठी ‘संगीत स्वरसम्राज्ञी’, प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता आशीष भिडे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ज्योती राऊळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुबोध पांडे, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटकातील गायक अभिनेता, अभिनेत्री म्हणून कृष्णा चारी, श्रद्धा जोशी यांची निवड करण्यात आली आहे. रंगभूमीव्यतिरिक्त इतर क्षेत्रांत भरीव काम करणाऱया रंगकर्मी पुरस्कारासाठी प्रदीप कबरे यांची निवड करण्यात आली आहे. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

रंगभूमीची झिंग सुटत नाही!

खरं तर गेली १५-२० वर्षे मी थिएटरपासून दूर आहे. तसा मी थिएटरशी संबंधित लोकांसोबत काम करतो, अनेकांना नाटकाचे प्रशिक्षण देतो, पण प्रत्यक्ष थिएटर करून बराच काळ लोटलाय. रंगभूमी ही झिंग आहे. रंगभूमीचा रंग एकदा लागला की तो तुम्हाला सोडत नाही. मला इथे नट आणि दिग्दर्शक म्हणून जिवंत नाटय़ानुभव मिळालाय. मी रंगभूमीचा जन्मभर ऋणी आहे असं डॉ. जब्बार पटेल यांनी म्हटलं

अजून उमेदीने काम करायचंय

नाटय़ परिषदेचा जीवनगौरव हा माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. इतकी वर्षे रंगभूमीची सेवा केली, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं ते सारं आठवतंय. मला अजून खूप काम करायचंय. खूप उमेद आहे. प्रेक्षकांची आणि नाटय़ परिषदेची मी खूप आभारी आहे असल्याचं ज्योती चांदेकरांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या