लंबूला लंबा केला! मसूद अझहरच्या भाच्याला जवानांनी यमसदनी पाठवला

कश्मीरमधील अवंतीपोरा भागात झालेल्या चकमकीत पोलिसांना आणि सैन्य दलाला एक मोठे यश आले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी कश्मीरच्या अवंतीपोरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यातल्या एकाचे नाव मोहम्मद इस्माईल असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. इस्माईल हा जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा भाचा आहे. त्याचं टोपण नाव लंबू असून शनिवारी जवानांनी त्याला लंबा केला.

इस्माईलची उंची साडेसहा फूट होती, ज्यामुळे त्याला लंबू हे टोपणनाव देण्यात आलं होतं. हा लंबू स्फोटकं हाताळण्यात पटाईत होता. पुलवामा हल्ल्यातही त्याचा सहभाग होता आणि NIA च्या आरोपपत्रातही त्याच्या नावाचा समावेश आहे. हा लंबू मुळचा पाकिस्तानातील पंजाब प्रातातल्या बहावलपूरचा रहिवासी आहे. पुलवामात 2019 आणि 2020 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तो सहभागी होता. या लंबूने त्रालमधल्या राष्ट्रीय महामार्गावर घातपाती कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. समीर अहमद डार याच्या मदतीने त्याने हा प्रयत्न केला होता. डार हा पुलवामातील काकपोराचा रहिवासी होता. 2020 साली बडगाम इथल्या चकमकीदरम्यान मोहम्मद इस्माईल पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. हाच ईस्माईल अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी दहशतवाद्यांनाही भेटला होता. कारमध्ये आणि जमिनीत स्फोटकं पेरण्याचं त्याने तंत्र आत्मसात केलं होतं. कश्मीर खोऱ्यातील शांततता भंग करण्यासाठी त्याने तरुणांना दगडफेक करण्यासाठी तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या