सराफाने आसरा दिला अन कामगार 8 लाखांचे सोने घेऊन पळाले

लॉकडाऊनमध्येही सराफाने मोठ्या विश्वासाने कामगारांना आसरा दिला होता. मात्र, दोन्ही कामगारांनी संगनमताने तब्बल 7 लाख 75 हजारांची सोन्याची लगड चोरून नेली आहे. ही घटना रविवार पेठेत घडली आहे. उज्वल प्रसाद मान्ना (वय 20 रा. पश्चिम बंगाल) आणि मोजारूल मोलिक (रा.कोंढवा, मूळ- पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जॉयनाथ माईती (वय 49, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉयनाथ कुटुंबासह रास्ता पेठेत राहायला असून त्यांचे रविवार पेठेत सोन्याचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे मोजारूल हा कामगार मागील 9 महिन्यापासून कामाला होता. गावावरून परत येताना त्याने उज्ज्वल ला कामासाठी दुकानात आणले होते. त्यामुळे जॉयनाथ यांनी उज्ज्वलला कामासाठी दुकानात ठेवून घेत राहण्याची सोय केली. त्यानंतर दोघेही कामगार दुकानात काम करीत होते.

एके दिवशी ग्राहकाने 7 लाख 75 हजारांची 153 ग्रॅम सोन्याची लगड दागिने बनविण्यासाठी दिली होती. त्यानुसार जॉयनाथ यांनी ती लगड दोन्ही कामगारांकडे दागिने बनविण्यासाठी दिली होती. मात्र, जादा पैसे कमविण्यासाठी दोघांनी संगनमताने पावणे आठ लाख रुपयांची सोन्याची लगड चोरून नेली. याप्रकरणी दोन्ही आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक तपासी अधिकारी श्रीकांत सावंत यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या