ग्लॅमरस आजीसाठी रोजच्या वापरातील दागिने

पूजा तावरे, फॅशन डिझायनर

कोणत्याही वयातील स्त्रीला दागिन्यांचे अप्रूप हे असतेच. मग आजच्या काळातील आजी तरी कशी मागे राहील… ग्लॅमरस आजीसाठी रोजच्या वापरातील दागिने…

बालपणी आपल्याला गोड गोड गोष्टी सांगणारी, गाणे गात व पाठ थोपटीत झोपवणारी, कुठे दुखले-खुपले तर हळदीचा लेप लावणारी, कुणी आमच्यावर रागावले तर आमची बाजू घेऊन भांडणारी, परीक्षेत पास झाल्यावर कौतुक करणारी ..अशी आजीची किती रूपे आठवावीत? आजी हे रसायनच वेगळे असते. प्रत्येकाची आजी अशी असतेच…थोडक्यात म्हणजे काय तर आजी म्हणजे सबकुछ!! आजी म्हटल्यावर टिपिकल कॉटन साडी, सुरकुतलेल्या चेहऱयाची, पिकलेल्या केसांची, डोळ्यावर भिंगाचा चष्मा, उतारवयामुळे किंचितशी वाकून किंवा काठीचा आधार घेऊन चालणारी एखादी वृद्ध स्त्री डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र सध्या काळ बदलला आहे. लहानपणी हवी असणारी वस्तू मिळण्याचं हक्काचं माणूस म्हणजे, आजी. तिच्या बटव्यात जगातील कुठलीही गोष्ट मिळू शकायची. आपली आजी म्हटलं की, नऊवारी व कपाळाला कुंकू आणि एक गळ्यात मंगळसूत्र किंवा एखादा अलंकार घालायची. आधी आजी ठुशी, मोहनमाळ, पाटल्या अशी ज्वेलरी वापरत असे, पण मॉडर्न जमान्याबरोबरच आजकालची आजी एथनिक, साउथ इंडियन, टेंपल ज्वेलरी वापरून ग्लॅमरस होत चालली आहे.

पूर्वी आजी चार पातळ बांगडय़ा आणि पाटल्या असे हातभर दागिने घालण्याची प्रथा होती, पण आता त्यांची जागा सोन्याच्या कडय़ांनी घेतली आहे. आता हिऱयांची नाजूक नक्षी असणाऱया सोन्यांच्या कडय़ांची चलती आहे.

आजच्या काळातली आजीदेखील ग्लॅमरस ग्रॅनी म्हणून ओळखू जाऊ लागली आहे. तिचा फॅशन सेन्स अधिकच खुलत जात आहे. नऊवार लुगडय़ातून पाचवार साडी, कुर्ता-जीन्स किंवा पंजाबी ड्रेसमध्ये आलेली आजी पाहिली की, एक लक्षात येतं वरचे कपडे जरी बदलले असले, तरी मानसिकता तशीच आहे.

नथींमध्येही वैविध्य

ब्राह्मणी नथ, कोकणी नथ, मराठा नथ आणि हल्ली मिळणारी बानूची नथ असे अनेक प्रकार यामध्ये  दिसतात. जास्तीत जास्त दागिने अंगावर दिसले की चांगलं, ही भावना आता राहिलेली नाही. उलट एखादाच दागिना पण तो उठून दिसणारा हवा, युनिक हवा असा समज आज प्रचलित होत आहे.

कोल्हापुरी साज

हा गळ्याभोवतीच पण जरा सैलसर बसतो आणि यात चंद्र, कमळ, मासा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात. पूर्वी हा फक्त सवाष्ण बायकाच घालीत पण आता सरसकट वापरात आढळतो.

ठसठशीत ठुशी

ठुशी हा पारंपरिक मराठी दागिना. घरातल्या बुजुर्ग स्त्रियांकडे अजूनही त्यांची जुनी ठुशी आवर्जून सापडते. सध्या ज्वेलरी डिझायनर्स या ठुशीमध्ये अनेक प्रयोग करत आहेत. त्यामध्ये हल्ली रंगीत खडे, डिस्को मणी वापरले जातात. ठुशीच्या डिझाइनमध्ये पेंडंट आणून डिझायनर ठुशी हल्ली बाजारात आली आहे. सोन्याऐवजी अँटिक गोल्डमध्ये हे दागिने केलेले असल्यानं ते पारंपरिक वाटतात.

भरगच्च लफ्फा

लफ्फा, तन्मणी, चिंचपेटी हे गळ्यातले पारंपरिक दागिने. यातला लफ्फा हा प्रकार लफ्फेदार खरा. हल्ली चोकर नावानं बाजारात दिसणारे दागिने लफ्फ्याच्या जवळ जाणारे आहेत. चोकर म्हणजे गळ्याशी भिडलेला लफ्फेदार दागिना. पारंपरिक लफ्फा खडे आणि मोती यांपासून घडवला जात असे. हल्लीचे चोकर मात्र खडय़ांबरोबरच कुंदन, अमेरिकन डायमंड्स वापरून घडवतात.

मोत्याची कुडी

कानातल्या कुडीमुळे चेहऱयावर येणारा खानदानी अदब शोभून दिसतो. सात्त्विकता वाढते. सतेज मोत्यांमुळे चेहऱयावरचे हावभावही लोभसवाणे दिसतात. कुडी हा शब्द देहाशी साधर्म्य करणारा आहे. देखणी मोत्याची कुडी आजीच्या कानात मिरवण्याचे कर्णभूषण. सोन्याचे किंवा मोत्याचे ६-७ मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना ‘कुडी’ म्हणतात. कुडय़ांव्यतिरिक्त  कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर,बाळी, वेल, यांसारखी आभूषणेही कानात घातली जातात.