
संत तुकाराम महाराजांविषयी वक्तव्य करून वाद ओढवून घेतलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नेहमी चर्चेत असतात. मुंबईनजीक मीरारोड भागात त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आलेल्या महिलांच्या दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
18 आणि 19 मार्च रोजी मीरारोड परिसरात बागेश्वर बाबाचा दरबार भरवण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला होता. तरीही हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खूप गर्दी झाली होती. त्यात महिला भाविकाचं प्रमाण अधिक होतं. कार्यक्रमाचा पहिला दिवस संपल्यानंतर उपस्थित असलेल्या भाविक महिलांपैकी काहींची मंगळसूत्र आणि दागिने यांची चोरी झाल्याचं आढळलं आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे पाच लाख इतकी आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 36 महिलांनी मंगळसूत्र आणि गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल केल्या आहेत. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एकूण 4 लाख 87 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे.