ट्रेनच्या एसी कोचमध्येच ‘टप टप बरसा पानी…’; प्रवाशांनी व्यक्त केला संताप

जबलपूरहून निजामुद्दीनला जाणाऱ्या जबलपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या एक्स्प्रेसच्या छतावरून पाणी टपकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वेतील प्रवासांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान जबलपूर- निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या लोकांनी रेल्वे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेन क्रमांक 22181 जबलपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एम-3 मध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी ट्रेनच्या छतावरून पाणी टपकत असल्याची तक्रार दिली. प्रवाशांनी याचा व्हिडिओही बनवून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी झाशी स्थानकावरील फलाटावर पोहोचले. यानंतर अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी रेल्वेतील डब्ब्यांची व्यवस्थित पाहणी केली. आणि रेल्वेच्या इतर तुटींचीही नोंद करण्यात आली. यानंतर रेल्वे आपल्या इच्छित स्थळी रवाना करण्यात आली.