दोन मुलांच्या आईनं पळून लग्न केलं, पंचायतीनं काढली गावभर धिंड

दोन मुलांच्या आईला एका तरुणासोबत पळून लग्न केल्याने भर पंचायतीत केस कापून गळ्यात चपलांचा हार घालून गावभर धिंड काढल्याची घटना झारखंड येथे घडली आहे. गावाने या जोडप्यावर बहिष्कार घातला असून पोलीस या जोडप्याचा शोध घेत आहेत.

चतरा जिल्ह्यातील सिमरीया येथील फुलवारीबागी खिजुरियाटांड गावातील बबिता देवी आणि विशेश्वर हे पती-पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत. मात्र बबिता देवीचे गावातील तरुण राजेश याच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि गेल्यावर्षी या दोघांनी पळून लग्न केले होते. तेव्हापासून गावातील मंडळी मिळून तिच्या मुलांचा सांभाळ करत होते. काही दिवसांपूर्वी बबिता आपला पती राजेश याच्यासोबत गावात परतल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यांनी आजूबाजूच्या चार गावच्या लोकांना बोलावून पंचायत भरवली. पुन्हा असाप्रकार गावात होऊ नये यासाठी या पती-पत्नीवर गावाने बहिष्कार घातला.

काही संतप्त गावकऱ्यांनी दोघांचे हात पिळून दोघांच्या गळ्यात चपलांची माळा घालून त्यांची गावभर धिंड काढली. दरम्यान एका महिलेने या दोघांचे केस कापण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र काही लोकांनी त्या महिलेला थांबवले. तोपर्यंत त्या पुरुषाचे केस कापले होते. बबिता देवी हिचा आधीचा नवरा विशेश्वर भुईया तिच्या त्या कृत्याबद्दल इतका संतापला होता की भर पंचायतीत त्याने राजेशच्या वडिलांना निर्घृणपणे मारहाण केली.

या घटनेबाबत सिमरिया पोलीस स्थानकात कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही. पोलीस स्थानकाचे प्रभारी गोविंद कुमार यांनी सांगितले की माहिती मिळताच सिमरीया पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र ते जोडप गावात नव्हते. पीडितांनी याबाबत तक्रार दिल्यास कारवाई करण्यात येईल. सध्या पोलीस त्या जोडप्याचा तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या