दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रासोबतच म्हणजे 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये तारखांची घोषणा केली. यानुसार झारखंडमध्ये 81 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात पार पडणार आहे. महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर, अर्ज छाननीची तारीख 30 ऑक्टोबर आणि अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख 4 नोव्हेंबर असणार आहे.
झारखंडमध्ये 24 जिल्हे असून 81 मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी 44 जनरल, 28 एसटी आणि 9 जागा एससीसाठी राखीव आहेत. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी समाप्त होणार आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांना 41 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे.
झारखंडमध्ये एकूण मतदारांची संख्या 2.9 कोटी आहे. यामध्ये 1.29 कोटी महिला आणि 1.31 कोटी पुरुष मतदारांचा समावेश आहे. यासाठी 29 हजार 562 मतदार केंद्र मतदानासाठी सज्ज असणार आहेत. सध्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष सत्तेत असून हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री आहेत.