डुकरासाठी लावला सापळा…जाळ्यात अडकला बिबट्या…वाचा सविस्तर…

जंगलाजवळ राहणारे काहीजण जंगली डुकराला पकडण्यासाठी सापळा लावतात. जंगली डुकराची शिकार करून अडचणीच्या काळात त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र, शिकार करण्याऐवजी शिकाऱ्याचीच शिकार होण्याची वेळ आली तर…अशीच घटना झारखंडच्या गिरीडीहमध्ये घडली आहे. गिरीडीहच्या जंगलाजवळील काही शिकाऱ्यांनी जंगली डुक्कर पकडण्यासाठी सापळा लावला होता.

जंगलातील भीमतरीजवळ सापळा लावलेल्या ठिकाणी डुक्कर अडकले आहे काय, ते बघण्यासाठी ते दुसऱ्या दिवशी जंगलात गेले. त्यावेळी एका जाळ्यात चक्क बिबट्या अडकल्याचे त्यांना दिसले. ते बघून त्यांची घाबरगुंडी उडाली. चवताळलेला बिबट्या जाळे तोडून बाहेर आला तर आपली खैर नाही, हे त्यांना जाणवले. त्यांनी तातडीने तेथून धूम ठोकून वन अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली.

जंगलाजवळील शिकारी बांबू आणि रस्सीपासून सापळा बनवून डुकराला पकडण्यासाठी तो लावतात. तो सापळा मजबूत नसल्याने मोठा वन्य प्राणी त्यात अडकल्यास तो त्यातून बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे जाळ्यात अडकलेला बिबट्या चवताळून जाळे तोडून बाहेर येण्याची भीती त्यांना होती. त्यांनी माहिती दिल्यानंतर गावातील रेंजर अनिल कुमार यांनी वनरक्षक पवन चौधरी यांना घटनास्थळी पाठवले.

जाळ्यातून बिबट्या बाहेर येण्याची शक्यता कमी असल्याचे लक्षात आल्यावर रेंजर अनिल कुमार यांनी हजारीबागमधून पिंजरा मागवला. बिबट्याला पिंजऱ्यात टाकून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे अनिल कुमार यांनी गावकऱ्यांना सांगितले. बिबट्याला पिंजऱ्यात बंद केल्यावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गिरीडीह जिल्ह्यात पहिल्यांदाच बिबट्या दिसल्याने हा कुतुहलाचा विषय होत आहे. तसेच या भागात आणखी काही बिबटे असल्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांमध्ये काही प्रमाणात भीतीही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या