चारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली 

480

झारखंड उच्च न्यायालयाने चारा घोटाळ्यातील दुमका कोषागारातील निधीच्या अपहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका फेटाळली आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सुनावणी पूर्ण केली. सीबीआय न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा अद्याप अर्धा कालवधी पूर्ण केला नसल्याने, लालूप्रसाद यांची जमीन याचिका फेटाळण्यात आली. तसेच चारा घोटाळ्याच्या चाईबासा कोषागारात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने जेडीयूचे माजी खासदार जगदीश शर्मा यांना जामीन मंजूर केला आहे.

सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना आयपीसी आणि पीडी कायद्यानुसार सात-सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना एकूण 14 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. लालूप्रसाद यांच्या जामिनाला विरोध करत सीबीआयने म्हटले आहे की, लालूप्रसाद यांनी दुमका कोषागार प्रकरणात जामीन याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात लालू यांनी केवळ 22 महिने तुरूंगात घालविले आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची जमीन याचिका फेटाळली आहे.

काय होतं चारा घोटाळा प्रकरण?

1996 साली बिहारच्या पशुपालन विभागात कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळा उघड झाला होता. आपल्या कार्यकाळात बिहारच्या विविध जिल्ह्यांच्या सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्यावर करण्यात आला होता. सीबीआयने लालूप्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं होतं. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावणी असून ते सध्या तुरुंगात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या