लाजिरवाणे… झारखंडमध्ये प्रेमी युगुलाला विवस्त्र करुन मारहाण

झारखंडमध्ये एक लाजिरवाणी घटना उघड झाली आहे. एका प्रमी युगुलाला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर जमावाने प्रेमी जोडप्याला मारहाण केली. युगुलाला बेदम मारल्यानंतर जमावाने त्या दोघांना विवस्त्र केले. त्यांच्या गळ्यात चपलांचा हार टाकला आणि त्या अवस्थेत त्यांना गावभर फिरवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील रंगाठाण्यात ही घटना घडली आहे.साहिबगंज जिल्ह्यात बाकुडी गावात एक तरुणी तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. तिचे गावातील एका तरुणाशी लग्न झाले होते. त्या तरुणीचे गावातील दुसऱ्या तरुणांशी प्रेमसंबंध होते. त्या दोघांना गावकऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत रेल्वे लाईनजवळ पाहिले. त्यानंतर थोड्याच वेळात गावकरी जमले आणि जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने त्यांना गावात आणले. तिथे पुन्हा बेदम मारहाण करत त्यांना विवस्त्र करण्यात आले. त्यांच्या गळ्यात चपलांचा हार टाकून त्या अवस्थेत त्यांना गावभर फिरवण्यात आले. तरुणांच्या कुटुंबियांना बोलावत बैठक घेण्यात आली. पंचायतीने तरुणाला 5 लाखांचा दंड ठोठावला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावाकडे धाव घेतली. जमावाच्या ताब्यात असलेल्या तरुणी आणि तरुणाची सुटका करण्यात आली. त्यांची सुटका करण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्या दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून त्या दोघांना पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडीओची माहिती घेण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या