झारखंडमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. दसऱ्याला नवऱ्याने साडी घेऊन दिली नाही म्हणून संतापलेल्या एका महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दुमका जिल्ह्यात बागझोपा गावात 26 वर्षाच्या महिलेने ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सेंदा देवी असे त्या महिलेचे नाव असून दसऱ्याला नवऱ्याने नवीन साडी घेतली नाही म्हणून ती नाराज होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या पतीकडे नवीन साडी मागितली होती. तिचा नवरा ट्रॅक्टर चालक आहे. त्याच्याकडे साडी घेण्यासाठी तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे तो साडी घेऊ शकला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.
सेंदा देवीच्या पतीनुसार, पत्नीने त्याच्याकडे नवी साडी मागितली होती. मात्र तो साडी घेऊन देऊ शकले नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि महिला घरातून बाहेर निघून गेली आणि ट्रेनच्याखाली उडी घेतली. सध्या पोलिसांनी महिलेच्या पतीसह त्यांच्या कुटुंबाच्या लोकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.