इतर मित्रपक्षांचेही भाजपसोबत बिनसायला सुरुवात, वाचा सविस्तर बातमी

6331

महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता अजूनही संपायचे नाव घेत नाहीयेत. दुसरीकडे झारखंडमध्ये भाजपच्या अडचणींत वाढ व्हायला लागली आहे. तिथे विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. या वादामुळे भाजपने ज्या 4 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये ऑल झारखंड स्टुडंट युनियनने त्यांचेही उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. लोकजनशक्ती पक्षानेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचं ठरवलं आहे. मित्रपक्षांसोबत सुरु असलेल्या या वादामुळे भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणं टाळलं आहे.

ऑल झारखंड स्टुडंट युनियनने आतापर्यंत 12 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत तर भाजपने 4 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. सिमरीया, मांडू, सिंदरी आणि चक्रधरपूर या मतदारसंघासाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यातील चक्रधरपूरमधून भाजपने तिथले प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांना उमेदवारी दिली आहे. जागावाटपातील वादामुळे ऑल झारखंड स्टुडंट युनियनने या चारही मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

या निवडणुकीसाठी ऑल झारखंड स्टुडंट युनियनने भाजपकडे 19 जागांची मागणी केली होती. भाजपने मात्र त्यांना फक्त 9 जागा देऊ शकतो असं सांगितलं. केंद्रात मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने भाजपकडे 6 जागांची मागणी केली होती. भाजपने त्यांचीही मागणी फेटाळली. यामुळे लोकजनशक्ती पक्षाने झारखंडच्या निवडणुका स्वबळावर लढवायचं ठरवलं आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजप, ऑल झारखंड स्टुडंट युनियन आणि लोजप एकत्र लढले होते. यात भाजने 72 जागांवर, ऑल झारखंड स्टुडंट युनियनने 8 जागांवर तर लोजप एका जागेवर निवडणूक लढले होते.

आपली प्रतिक्रिया द्या