कल्याण : सट्टाकिंग जिग्नेश ठक्करची गोळ्या घालून हत्या

सट्टाकिंग जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची शुक्रवारी (31 जुलै) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर गोळीबार केला. एमएफसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून जिग्नेशच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

जिग्नेश ठक्कर याचे कल्याण, उल्हासनगर, ठाणे भागामध्ये अनेक ठिकाणी मटका आणि पत्त्यांचे क्लब आहेत. जिग्नेश हा क्रिकेट मॅचवर सट्टाही घेत होता. जिग्नेश शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन परिसरातील नीलम गल्लीत आपल्या कार्यालयाबाहेर बसला होता. तिथून तो बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोर त्याच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेले होते. जिग्नेशला छातीमध्ये चार गोळ्या लागल्या होत्या. त्याला तातडीने कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी ठक्कर याचे मारेकरी शोधून काढण्यासाठी पथके तयार केली आहे. ज्या पद्धतीने जिग्नेशची हत्या करण्यात आली ते पाहता त्याच्यावर दोनपेक्षा अधिक जणांनी गोळीबार केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी ही हत्या झाली त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या