‘जिओ फायबर’मुळे रिलायन्सचे शेअर्स वधारले

3441

शेअर बाजार गडगडला असला तरी जिओ गिगा फायबरमुळे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्समध्ये तब्बल 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. रिलायन्सचे शेअर्स 1,302.50 रुपयांवर पोहोचले असून जानेवारी 2009 म्हणजेच दहा वर्षांनंतर ही सर्वात मोठी वाढ असल्याचे बोलले जात आहे. बीएसईवर रिलायन्सचे मार्केट कॅप 84 हजार कोटी रुपयांवरून 8.21 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

रिलायन्सचे शेअर्स तेजीत असले तरी अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड सुरूच आहे. भारती एअरटेलचे शेअर्स 4 टक्क्यांनी तर वोडाफोन आयडियाचे शेअर्स 5 टक्क्यांनी खाली आले आहेत. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 42 व्या सर्वसाधारण सभेत जिओ फायबरसह केलेल्या अन्य घोषणांमुळे रिलायन्सच्या शेअर्स खरेदीकडे कल वाढत असल्याचे अर्थतज्ञांनी स्पष्ट केले.

सर्वाधिक मार्केट कॅप टीसीएसचे

टाटा ग्रुपपैकी एक असलेल्या टीसीएस या कंपनीचे मार्केट कॅप 8.37 लाख कोटी एवढे आहे. गेल्या वर्षभरात रिलायन्स आणि टीसीएसचे मार्केट कॅप यामध्ये अनेकदा स्पर्धा पहायला मिळाली. या दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या 9 लाख कोटी मार्केट कॅपवाली पहिली हिंदुस्थानी कंपनी बनण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.

निर्देशांकात 624 अंकांची घट, तर निफ्टीची 10,925 वर घसरण

जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे मंगळवारी शेअर बाजाराने गटांगळय़ा खाल्ल्या. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यांसारख्या बडय़ा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली. निर्देशांकात 624 अंकांची घट होऊन 37 हजारांच्या खाली पातळी आली. दुसरीकडे निफ्टीमध्ये 183 अंकांची घट होऊन तो 10,925 वर बंद झाला.

यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी

  • सौदी अरामकोची रिलायन्सच्या रिफायनरी केमिकल व्यापारात 20 टक्के शेअर्सची खरेदी. रिलायन्समधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक आहे.
  • रिलायन्स फ्युअल रिटेल व्यापारातील 49 टक्के हिस्सा युकेच्या बीपी कंपनीला 7 हजार कोटी रुपयांना विकणार
  • मार्च 2021 पर्यंत रिलायन्सची कर्जमुक्त होण्याची तयारी; अरामको आणि बीपी कंपनीला शेअर्स विक्री करून मिळणारी रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरणार

आतापर्यंतचे रिलायन्सचे रेकॉर्ड

  • ऑक्टोबर 2007 – 100 अरब डॉलरच्या मार्केट कॅपवाली देशातील पहिली कंपनी.
  • जुलै 2018 – 11 वर्षांनंतर पुन्हा 100 अरब डॉलरच्या व्यवसायाचे लक्ष्य साध्य
  • ऑगस्ट 2018 – 8 लाख कोटी मार्केट कॅपवाली देशातील पहिली कंपनी
  • जानेवारी 2019 – 10 हजार कोटी नफा कमावणारी पहिली कंपनी
आपली प्रतिक्रिया द्या