जितेंद्र आणि श्रीदेवी यांना एकत्र पाहून तुषार कपूर संतापला होता, भडकून केला होता तमाशा

बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रींच्या काही जोड्या प्रचंड गाजल्या आहेत. यातील एक जोडी होती ती जितेंद्र आणि श्रीदेवी यांची. जितेंद्र आणि श्रीदेवीची ही जोडी सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या जोडीने 16 सिनेमे दिले ज्यातील बहुतांश सिनेमे हिट झाले होते. श्रीदेवीचे करिअर मार्गी लावण्यात जितेंद्र यांचा मोठा हात असल्याचे बोलले जाते. कारण जितेंद्र यांनी नवख्या श्रीदेवीसोबत सिनेमा करण्यापूर्वी तिचे जवळपास सगळे सिनेमे फ्लॉप ठरले होते. राघवेंद्र राव निर्मित हिम्मतवाला या चित्रपटासाठी जितेंद्र यांचे नाव निश्चित झाले होते. जितेंद्र यांनी हट्ट करत श्रीदेवीचे नाव या चित्रपटासाठी निश्चित करवून घेतले होते. हा सिनेमा गाजला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने श्रीदेवीच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली.

सिनेरसिकांना जरी जितेंद्र आणि श्रीदेवी यांची जोडी आवडली असली तरी जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूरला श्रीदेवी पसंत पडली नव्हती. जितेंद्र यांनी श्रीदेवीसोबत काम करण्याचं निश्चित केलं तेव्हा तुषार लहान होता. श्रीदेवीसोबत काम करण्यापूर्वी जितेंद्र यांनी हेमा मालिनी, जया प्रदा यांच्यासोबत काम केलं होतं. या अभिनेत्रींसोबत वडिलांना पाहण्याची तुषारला सवय झाली होती. याच आपल्या वडिलांच्या अभिनेत्री आहेत असं तुषारला वाटायला लागलं होतं. हिम्मतवालाच्या डबिंगच्यावेळी जितेंद्र यांच्यासोबत तुषारने जेव्हा श्रीदेवीला पाहिलं तेव्हा तो भयंकर संतापला होता. पुढे काय झालं हे त्याने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं होतं.

तुषारने जितेंद्र यांच्यासोबत या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्याने सांगितलं की ‘जितेंद्र यांनी बरेच चित्रपट केले, आम्ही त्यांचे यातील बहुतांश चित्रपट पाहिले होते. त्यामुळे कोणाचं काय काम आहे हे आम्हाला कळायला लागलं होतं.’ तुषारने सांगितलं की 1983 साली तो हिम्मतवालाच्या डबिंगसाठी जितेंद्र यांच्यासोबत गेला होता. तिथे श्रीदेवीला पाहिल्यानंतर तो जाम संतापला होता. तुषारने तिथे मोठमोठ्याने आरडाओरडा करत तमाशा केला होता.  हिच्यासोबत तुम्ही काम का करत आहात ? कोण आहे ती ? असे तुषार ओरडून ओरडून प्रश्न विचारत होता. आपल्या वडिलांच्या 2-4 च हिरोईन आहेत असं डोक्यात फिट्ट बसल्याने नवी हिरोईन पाहून मी संतापलो होतो असं तुषारने सांगितलंय.

हिम्मतवाला 1983 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील गाणीही आजपर्यंत लोकांच्या लक्षात आहेत. खासकरून ‘नैनो मे सपना , सपने मे सजनी’ हे गाणं सर्वकालीन प्रसिद्ध हिंदी गाण्यांपैकी एक बनलं. हिम्मतवालाच्या प्रसिद्धीनंतर जितेंद्र यांनी पुढच्या बऱ्याच चित्रपटात श्रीदेवीच अभिनेत्री म्हणून हवी असा आग्रह करायला सुरुवात केली. हिम्मतवाला चित्रपटानंतर जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्या अफेअरच्या अफवा सुरू झाल्या होत्या. जितेंद्र यांच्या आग्रहामुळे या अफवांना अजून हवा मिळाली होती. या अफवांमुळे जितेंद्र आणि त्यांची पत्नी शोभा कपूर यांच्यात भांडणेही झाली होती. जनसत्ताच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या