कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बनवले ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’, देशातला पहिलाच अभिनव प्रयोग

583

कोरोनाग्रस्त व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यापासून विषाणू संसर्ग होऊ शकतो. संसर्ग रोखण्यासाठी सर जे. जे. रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’ बनवले आहे. त्यातून रुग्णाची वाहतूक केल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो. देशात पहिल्यांदाच असे कवच बनवले आहे.

रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याच्या विविध आवश्यक चाचण्या कराव्या लागतात.  या चाचण्यांसाठी रुग्णाला वॉर्डातून एक्स-रे विभाग, सीटी स्कॅन व एमआरआय, रक्तचाचणी विभाग अशा ठिकाणी न्यावे लागते. वॉर्डापासून या विभागांपर्यंत रुग्णाला नेत असताना त्याच्याद्वारे अनेकांना संसर्ग होतो. हा संसर्ग ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’च्या सहाय्याने निश्चितच टाळता येईल असा विश्वास डॉ. भंडारवार आणि त्यांच्या टीममधील डॉ. अमोल वाघ व अन्य डॉक्टरांनी व्यक्त केला.

असे आहे कवच…

पेशंट ट्रान्सपोर्ट कवच ही एक काचेची पेटी आहे. त्या पेटीला ठिकठिकाणी लांब हॅन्डग्लोव्हज लावले गेले आहेत. त्या हॅन्डग्लोव्हजद्वारेच डॉक्टर त्याच्यावर उपचार व चाचण्या करू शकतात. पेटीला हेपाफिल्टर्स लावले गेले आहेत. पेटीतील रुग्णाला ऑक्सीजन पुरवठा होईल पण पेटीतून कार्बनडायऑक्साईड मात्र बाहेर फेकला जाईल अशी व्यवस्था आहे. रुग्णाला व्हेंटीलेटरही कनेक्ट करण्याची सुविधा आहे.

विषाणू पेटीतच मारण्याचे लक्ष्य

रुग्णाच्या श्वासावाटे बाहेर फेकले जाणारे विषाणू पेटीतच राहतील अशी व्यवस्था त्यात आहे. ते विषाणू एक्झॉसद्वारे पेटीतीलच एका चेंबरमध्ये अडकून राहतात. आता त्या चेंबरला यूव्ही लाईट्स लावण्यात येणार आहेत. या लाईट्समुळे विषाणू आतमध्येच मारले जातील.

आपली प्रतिक्रिया द्या