आता पुन्हा कधीही जे.जे.त जाणार नाही, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ डॉक्टरांचा निर्णय

‘‘सर जे.जे. रुग्णालयाच्या प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरून आमची एकतर्फी चौकशी करून दोषी ठरवले. त्यामुळे आमची बदनामी झाली. हे सर्व अत्यंत क्लेशदायक आहे. आता पुन्हा कधीही जे.जे.त जाणार नाही,’’ असे ज्येष्ठ नेत्रशल्यविशारद, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आज सांगितले. मुंबई आणि अंबेजोगाईत मी डॉक्टरांच्या अनेक पिढय़ा घडवल्या, ते विविध ठिकाणी रुग्णसेवा देत आहेत, इतके करूनही आरोप होतात तेव्हा मन उद्विग्न होते, असे डॉ. लहाने या वेळी म्हणाले.

जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारी, प्रशासनाने केलेली चौकशी आणि निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप या सर्व घडामोडींमध्ये डॉ. लहाने यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आम्हाला शस्त्रक्रिया करू न देता आमच्या शस्त्रक्रिया डॉ. लहाने, डॉ. पारेख आणि टीमने चोरल्या म्हणजेच स्वतःच्या नावावर दाखवल्या असा निवासी डॉक्टरांचा आरोप आहे. तो चुकीचा आहे. निवासी डॉक्टरांना आम्ही टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया शिकवत असतो आणि आमचे नाव लिहून जबाबदारी घेत असतो. ते शस्त्रक्रिया करत असतात आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. मग आम्ही चोर कसे, असा सवाल त्यांनी केला. इतर रुग्णालयांत विद्यार्थ्यांना शिकवल्या जात नाहीत, अशा सहा प्रकारच्या अद्ययावत शस्त्रक्रिया आम्ही शिकवतो, असेही ते म्हणाले.

ही कसली एकतर्फी चौकशी?

आमची चौकशी करा असे आमचे स्पष्ट म्हणणे आहे. पण चौकशी समितीने केवळ तक्रारींवर एकतर्फी अहवाल दिला. आमचे जाबजबाब नोंदवलेच नाहीत. ही कसली चौकशी? याचाच अर्थ अधिष्ठातांना आम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा आहे, असा आरोप या वेळी डॉ. लहाने यांनी केला.

  31 तारखेला ठीक 4.40 वाजता राजीनामे दिलेत

अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या चुकीची माहिती देत असल्याचाही आरोप डॉ. लहाने यांनी या वेळी केला. राजीनामे आमच्याकडे आलेच नाहीत, असे त्यांनी सुरुवातीला सांगितले आणि नंतर आलेत पण विहित नमुन्यात नाहीत, त्यावर तारीख नाही असे त्या म्हणाल्या. पण आम्ही नऊ डॉक्टरांनी 31 मे रोजी सायंकाळी ठीक 4.40 वाजता राजीनामे दिले आहेत, असे डॉ. लहाने म्हणाले.

मुलांनाच आम्ही नको आहोत तर का थांबायचे?

जे.जे. रुग्णालयात अनेक वर्षे आम्ही रात्रंदिवस राबलो. 12 वर्षांत 1 लाख 56 हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. गोरगरीब रुग्णांची सेवा केली. तेथील विद्यार्थ्यांनाच आम्ही नको आहोत, असे त्यांच्या व्हिडियो बोलण्यावरून दिसते. यू-टय़ूबवर त्यांनी तसा व्हिडियो टाकला आहे. अधिष्ठातांना ते मॅडम बोलतात आणि आमचा एकेरी उल्लेख करतात. जिथे मुलांनाच आम्ही नको आहोत तिथे का थांबायचे, असे सांगताना डॉ. लहाने भावनाशील झाले. आमच्यामुळे मुलांना त्रास होऊ नये या प्रामाणिक भावनेतून आम्ही सगळे स्वतःहून या व्यवस्थेतून बाहेर पडत आहोत. रुग्णांसाठी बाहेर राहून काम करू, असे ते म्हणाले.

विद्यार्थांना आम्ही माफ केले, अधिष्ठातांवर कारवाई करा!

तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आमचा काहीच राग नाही. त्यांना आम्ही कधीच माफ केले आहे. त्यांना आमची गरज असेल तर आम्ही त्यांना शिकवू. त्यांच्यावर कारवाईची आमची मागणी नाही. पण शासनाला आणि मीडियाला चुकीची माहिती देणाऱ्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांची चौकशी करावी आणि दोषी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे डॉ. लहाने म्हणाले.

गरीब रुग्णांसाठी माझे रघुनाथ नेत्रालयखुले

डॉ. लहाने यांच्या ख्यातीमुळे जे.जे. रुग्णालयात हजारो रुग्ण येत असतात. डॉ. लहाने तेथून गेले तर त्यांनी काय करायचे असे या वेळी माध्यमांनी विचारले. त्यावर प्रभादेवीत माझे ‘रघुनाथ नेत्रालय’ आहे. ते गरीब रुग्णांसाठी खुले आहे. तिथे त्यांनी कधीही यावे, असे डॉ. लहाने म्हणाले. अंबेजोगाई येथेही ‘रघुनाथ नेत्रालय’ असून मुरुड-जंजिरा येथे अंजनाबाई डायलिसीस सेंटर आहे. त्या माध्यमातूनही आम्ही गोरगरीब रुग्णांची सेवा करतो, असेही त्यांनी सांगितले. मी मुंबईत डॉक्टरांच्या 30 पिढय़ा घडवल्या आहेत. एवढे शिकवल्यावरही आरोप झाल्याने आम्ही उद्विग्न झालो आहोत, असेही ते म्हणाले.  या पत्रकार परिषदेला डॉ. रागिणी पारेख, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. शशी कपूर,  डॉ. स्वरंजीतसिंग भट्टी, डॉ. दीपक भट, डॉ. अश्विन बाफना आदी उपस्थित होते.

तातडीने तोडगा काढा

सर जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला सामूहिक राजीनामा आणि मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप यामुळे रुग्णसेवेवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्राद्वारे केली. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल तत्काळ थांबविण्याची गरज आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

नेत्रोपचार विभाग ओस

नेहमी शेकडो रुग्णांनी गजबजणारा जे.जे.चा नेत्रोपचार विभाग 31 मेनंतर डॉ. लहाने, डॉ. पारेख आणि टीमने सामूहिक राजीनामे दिल्यानंतर ओस पडला आहे. फक्त दोनच ज्युनियर डॉक्टर तिथे आहेत. ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत बरीच घसरली आहे. शस्त्रक्रियाही ठप्प पडल्या आहेत. एरव्ही रोज शंभरावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत होत्या. जे.जे. रुग्णालयात दोन दिवसांत 47 शस्त्र्ाक्रिया झाल्या. मात्र नेत्ररोग विभागात एकही शस्त्र्ाक्रिया झाली नसल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली आहे.