जम्मू-कश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला; १ शहीद, ८ जखमी

40

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर येथील पंथा चौक परिसरात पोलिसांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. गस्तीसाठी निघालेल्या पोलीस पथकाच्या वाहनाला लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला आणि ८ पोलीस जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याचे जाहीर केले आहे.

मागील काही दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा पथकाने कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे काही प्रमुख दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा पथकाच्या या कारवाईचा बदला म्हणून तोयबाच्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

गोळीबार करुन दहशतवादी पळून गेले आहेत. पंथा चौक हा एक गजबजलेला परिसर आहे. त्यामुळे एखाद्या इमारतीत लपून दहशतवादी पुन्हा गोळीबार करण्याची शक्यता आहे. सर्व शक्यता लक्षात घेऊन पंथा चौक परिसरात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम हाती घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या