जेएनपीटी बंदरात सापडले 1725 कोटींचे ड्रग्ज, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरातून तब्बल 20 हजार किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1725 कोटी रुपये इतकी आहे. दिल्ली पोलिसांनी या कारवाईबाबत बुधवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी दोन अफगाणी नागरिकांना अटक केली होती. मुस्तफा स्टानिकझाई आणि रहिमुल्ला रहिमी अशी या दोघांची नावे होते. या दोघांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी 312 किलो अंमली पदार्थ पकडले होते. या कारवाईनंतर पोलिसांना नवी मुंबईतील अंमली पदार्थांच्या मोठ्या खेपेबाबत माहिती मिळाली होती.

पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अंमली पदार्थांचा कंटेनर हा 21 जून 2021 ला जेएनपीटी बंदरात आला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत हा कंटेनर ताब्यात घेतला आहे. कोणत्याच सुरक्षा यंत्रणांना आतापर्यंत याबाबत माहिती नव्हती असं दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.