जेएनपीटीत सेझ, सवा लाख कोकणी तरुणांना मिळणार नोकऱया

आपल्या धडाकेबाज कामाच्या शैलीने परिचित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील पंतप्रधानांसोबत पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) अंतर्गत न्हावाशेवा येथील सुमारे 300 एकर जागेवर स्पेशल इकॉनॉमिक झोन होणार आहे. या ठिकाणी येणाऱया कंपन्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून सुमारे सवा लाख नोकऱयांमध्ये रायगड, कोकणमधील तरुणांना प्रामुख्याने नोकऱया दिल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.

मुंबईत एका पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. जेएनपीटीच्या 300 एकर जागेवर केंद्र सरकारने सेझला परवानगी दिली आहे. यामध्ये सुमारे 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार असून 40 आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे आपले उद्योग उभारणार आहेत. या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे गडकरी म्हणाले.

जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या येणार

जेएनपीटीमध्ये होणाऱया या सेझमध्ये प्रामुख्याने जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आपले उद्योग थाटणार आहेत. मेक इन इंडियाअंतर्गत झालेल्या करारानुसार फॉक्सकॉन या कंपनीलाही या ठिकाणी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही कंपनी ऍपल फोनची निर्मिती येथे करणार आहे.