जेएनयूमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

42

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने सोमवारी संध्याकाळी मित्राच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मुथुकृष्णण असे त्याचे नाव असून तो जेएनयूमध्ये एम.फील करत होता. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुथुकृष्णण मुळचा तामीळनाडूचा होता. काही दिवसांपासून तो तणावखाली होता. सोमवारी तो दक्षिण दिल्लीतील मुनिरका विहार येथे राहणाऱ्या एका मित्राकडे गेला होता. दुपारचे जेवण झाल्यावर त्याने मित्राला झोप येत असल्याचे सांगितले आणि तो बेडरुममध्ये जाऊन झोपला. झोपण्याआधी त्याने आतून कडी लावून घेतली होती. संध्याकाळ झाली तरी मुथुकृष्णण बेडरुमबाहेर न आल्याने मित्राने दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मित्राने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी बेडरुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी गळफास घेतलेला मुथुकृष्णणचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान, हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर मोठा संघर्ष झाला होता. मुथुकृष्णणने यात महत्वाची भूमिका बजावली होती. गेल्या काही दिवसांपासून जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद सुरू आहे. त्यामुळे मुथुकृष्णण शैक्षणिक व्यवस्थेवर नाराज होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या