मुथुकृष्णणला श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्र्यांवर बूट भिरकावला

29

सामना ऑनलाईन। चेन्नई

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा दिवंगत विद्यार्थी मुथुकृष्णण याला श्रद्धांजली वाहण्यासाठी चेन्नईत आलेले केंद्रीय मंत्री बी. राधाकृष्णण यांना संतप्त जमावाचा सामना करावा लागला. यावेळी गर्दीतील एका व्यक्तीने त्यांच्यावर बूट भिरकावला. दरम्यान, बूट फेकणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जेएनयूचा विद्यार्थी मुथुकृष्णण (२७) याने सोमवारी दिल्लीतील मुनिरका येथे मित्राच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मुथुच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत हजारो विद्यार्थी तामीळनाडूत रस्त्यावर उतरले आहेत. आज मुथुला श्रध्दांजली वाहण्यासाठी पी. राधाकृष्णण पोहोचले असता संतप्त जमावाच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर राधाकृष्णण यांनी मुथुच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्याला श्रद्धांजली वाहिली व त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मात्र असे करून देखील जमाव शांत झाला नाही. केंद्र सरकारच्या विरोधातील खदखद असल्याने गर्दीतील एकाने पी. राधाकृष्णण यांच्यावर बूट भिरकावला. पोलिसांनी त्या युवकास तात्काळ ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या