मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहाय्यक’ (पूर्वीचे पदनाम ः लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 जागांची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. यासाठी 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहाय्यक’ (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येतील. यामध्ये अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती-अ (49), भटक्या जमाती-ब (54), भटक्या जमाती-क (39), भटक्या जमाती-ड (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक (185), सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासवर्ग (185), खुला प्रवर्ग (506 ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.
असा करा अर्ज
उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी 9513253233 हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान (दुपारी 1.30 ते 2.30 वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल.