राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या परळच्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात नोकरी देण्याच्या नावाखाली तरुण-तरुणींची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत दोन जणांनी नोकरीच्या नावाखाली सुमारे साडेसहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे. या नोकरभरतीमध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हाफकिनमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली अजून चार ते पाच तरुण-तरुणींकडून पैसे उकळल्याचा संशय आहे. फसवणूक झालेल्या काही तरुणांनी भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळटाळ केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काही सरकारी अधिकाऱ्यांचा या रॅकेटला वरदहस्त असल्याची चर्चा आहे.
याप्रकरणी दर्शना शहाजी जाधव हिने खुशबू शमीत कोटीयल हिच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. परळ येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात मी पैसे भरून कायमस्वरूपी नोकरीला लागल्याचे खुशबूने सांगितले. कम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणून कायमस्वरुपी नोकरी लावण्यासाठी तिने 1 लाख 90 हजार रुपये मागितले असे दर्शनाने तक्रारीत नमूद केले आहे. पैसे दिल्यावर 100 टक्के काम होणार. नोकरी मिळाली नाही तर पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले. दर्शनाचा मावसभाऊ सुजय जगन्नाथ ढावर यालाही हाफकिनमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्याच्या नोकरीसाठी 1 लाख 40 हजार रुपये पाठवले. नंतर इंटरह्यूमध्ये पास होण्यासाठी आणखीन चाळीस हजार रुपये दिले. नंतर हाफकिनच्या गेटपाससाठी दोन हजार रुपये पाठवले, पण नोकरी काही मिळाली नाही. नोकरी कधी मिळणार अशी खुशबूकडे वारंवार विचारणा करण्याचा प्रयत्न केला, पण फोन उचलला नाही. नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आपली आपली 5 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तर विक्रोळीतील अतुल प्रकाश साठे याने विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली आपली एक लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारी नमूद केले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या बाबीस वर्षांच्या अतुलला हाफकिनमध्ये कम्प्युटर ऑपरेटर नोकरी आहे. मला एक लाख वीस हजार रुपये दिले तर दरमहा 32 हजार रुपये पगार मिळेल असे सांगण्यात आले. अतुलने खुशबूला पैसे दिले, पण नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे त्याने तिला वारंवार फोन करून नोकरीबाबत विचारणा केली, मात्र नोकरी मिळाली नाही आणि पैसेही मिळाले नाहीत. अशा प्रकारे हाफकिनमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली चार ते पाच जणाकडून पैसे घेतल्याचा संशय या तक्रारीत व्यक्त केला आहे. पैसेही गेले आणि नोकरी न मिळाल्याने अखेर अतुलने विक्रोळी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. खुशबू विलास उतेकर ऊर्फ खुशबू शमिक कोटीयन हिच्या विरोधात वरळी व विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये हा सर्व तपशील नमूद केला आहे.