मला आयुष्यभर पोसा! उच्चशिक्षित बेरोजगार आई-बापाला कोर्टात खेचणार

आपला मुलगा किंवा मुलगी चांगले शिकावेत, उत्तम पगाराची नोकरी मिळवावी, आपल्या उतारवयात आपला सांभाळ करावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. फैज सिद्दीकी नावाच्या 41 वर्षांच्या व्यक्तीच्या आईवडिलांचीही हीच इच्छा होती. फैजने ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. मात्र त्याला अजूनही नोकरी मिळालेली नाहीये. नोकरी शोधण्याचा थोडाफार प्रयत्न केल्यानंतर कंटाळलेल्या फैजने हा नाद सोडून दिला असून आई-बापाने आपल्याला पोसावं आणि आपण तसंच जगावं हा मनाशी निश्चय केला आहे. त्यासाठीच त्याने या दोघांविरोधात खटला दाखल करण्याचं ठरवलं आहे.

फैजचे वडील जावेद आणि आई रुक्षंदा हे दुबईला राहतात. या दोघांचं लंडनमध्ये घर असून त्यांनी जवळपास 20 वर्ष ते फैजला कोणतेही भाडं न घेता राहायला दिलं होतं. या घराची किंमत जवळपास 8 कोटींच्या घरात आहे. फैजचा सगळा खर्चंही हे दोघे उचलत होते. जावेद यांचे वय 71 असून त्यांच्या बायकोचे वय 69 इतके आहे. कौटुंबिक कलहामुळे त्यांना आपल्या थोराड मुलाच्या पालनपोषणाचा खर्च परवडेनासा झाला आहे. तरीही आपण मुलाला आठवड्याला जवळपास 34 हजार रुपये देत असल्याचं या दोघांनी म्हटलं आहे. आता मुलाचा खर्च उचलणं आपल्याला शक्य नसल्याचं या दोघांनी म्हटलंय.

पालकांनी खर्च उचलणे शक्य नसल्याचे सांगितल्याने फैज संतापला असून त्यांनी आपली आयुष्यभराची तरतूद केली पाहिजे, आपल्या पालनपोषणाचा खर्च दिला पाहीजे असं त्याचं म्हणणं आहे. त्याने हीच मागणी कौटुंबिक न्यायालयात केली होती. तिथे त्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर फैजने हीच याचिका आता वरच्या कोर्टात दाखल केली आहे. याच फैजने ऑक्सफर्ड संस्थेलाही कोर्टात खेचलं होतं. आपल्याला पहिला नंबर मिळाला नाही, ज्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी आपल्या हातून गेली असं त्याने याचिकेत म्हटलं होतं. आपल्याला महाविद्यालयात नीट शिकवलं नाही, त्यामुळे आपल्याला चांगले मार्क मिळाले नाहीत असा आरोप त्याने याचिकेत केला होता. त्याची ही याचिका कोर्टाने तत्काळ कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या