जोगेश्वरीतील पादचारी पूल एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत, एकनाथ शिंदे यांची माहिती

जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे फाटकाजवळील पादचारी पुलाचे काम या वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.

या पादचारी पुलाचे काम रखडले आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या पुलाचे काम प्रगतिपथावर असून एप्रिल 2021 पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. सध्या या पुलाला सरकते जिने बसविण्याचे काम प्रगतिपथावर असून भूमिगत सेवा, विद्युत वाहिन्या, अरुंद रस्ता, बांधकामे अन्यत्र स्थलांतरित करणे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या पुलाच्या बांधकामास विलंब झाल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु या विलंबामुळे प्रकल्पाच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

जोगेश्वरी पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवरील मलकाम बागलगतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रलंबित असल्याने जिना उतरवणे शक्य होत नसल्याने हा पादचारी पूल बस डेपोसमोरील रस्त्याच्या पदपथावर उतरविण्यात येणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या