लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पराभवाची धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असून आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या 13 ऑक्टोबरला मुंबईत ‘हॉटेल ताज लँडस् एन्ड’येथे होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यामध्ये संबोधित करणार आहेत. राजकीदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभेच्या लढाईत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनी भक्कम एकजूट करत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजप आणि सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या मिंधे आणि अजितदादा गटाला आसमान दाखवले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.
निवडणुकीसाठीचे जागा वाटप, गद्दार सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती यासाठी आघाडीच्या नेत्यांच्या वरचेवर बैठका पार पडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.