मोदींच्या भाषणातील विनोद

१९७०च्या दशकात अमिताभ बच्चन यांची बॉलीवूडमध्ये अन्यायाविरुद्ध लढणारा Angry young man अशी इमेज तयार झाली होती. त्या इमेज निर्मितीचे जनक होते सलीम-जावेद. त्यांनी अमिताभचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगले ठसावे यासाठी आणखी दुसरे दिसायला देखणा, रोमांटिक गाणे गाणारा, गुड बॉयचे असे शशी कपूरचे व्यक्तिमत्त्व तयार केले ज्यामुळे तुलनेने अमिताभचे व्यक्तिमत्त्व अधिक ठाशीव झाले. आता गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक जबरदस्त वक्ता अशी इमेज तयार झालेली आहे. अर्थात त्यात देखील त्यांच्या या इमेज बिल्डिंगमध्ये राहुल गांधींना मोठे क्रेडिट द्यावे लागेल. याचा चंद्रकांत बर्वे यांनी घेतलेला वेध…

राजकीय नेते हे चांगले वक्ते असावेत, पण त्या वत्तृत्वाचा गुण काही वत्तृत्व स्पर्धा जिंकून ट्रॉफी मिळवण्यासाठी नसतो, तर आपले विचार समोरच्या लाखो प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावेत व सत्ता आपण जिंकावी हा असतो, अन् त्या दृष्टीने पाहिल्यास पंतप्रधान मोदी हे फार चांगले (उत्कृष्ट नव्हे) वक्ते आहेत. त्यामुळेच ते एकटे समर्थपणे निवडणुकीचा फड जिंकू शकतात. त्यांचे विचार माझ्यासारख्या करोडो लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. ते जरी गंभीरपणे भाषणे देत असले तरी मला मात्र खूपदा त्यातील छुपा विनोद भावतो व हसू येते. अशी त्यांच्या भाषणातील अनेक उदाहरणे देता येतील; पण सगळ्यांना माहीत असलेली काही भाषणातील उतारे बघा.

स्वच्छता अभियानसारखे राष्ट्रीय महत्त्वाचे अभियान सुरू करताना मोदी म्हणतात “हमारे देशका हर व्यक्ती अगर ठानले तो दुनियाकी कोई ताकद हमारे देश को गंदा नही कर सकती.’’ आता या वाक्यावर हसू येणं मी टाळू शकत नाही. अरे इथे “दुनिया की ताकद’’चा प्रश्नच येत नाही. (असं थोडीच आहे की आमच्या गल्लीत रात्री चिनी-पाकिस्तानी लोक कचरा टाकतात) जर कोणत्या परराष्ट्र धोरणाविषयी किंवा संरक्षण सिद्धतेविषयी एखादा जबरदस्त निर्णय असेल तर हे वाक्य ठीक आहे, पण इथे आपण लोकांनीच आपला परिसर, आपले रस्ते स्वच्छ ठेवावेत, यात इतर देशांचा प्रश्न येतोच कुठे? पण नाही, हे वाक्य मोदी फेकतात आणि त्याची जाहिरात देखील होते. (भक्त मंडळी लगेच “मोदी…. मोदी…. मोदी’’ असा गजर करायला मोकळी) आता खरं म्हणजे “हमारे देश का हर व्यक्ती अगर ठानले’’ म्हटल्यानंतर देशसे भ्रष्टाचार नष्ट हो जाएगा, आतंकवाद नष्ट हो जाएगा, काला धन नष्ट हो जाएगा, खून खराबा बंद हो जाएगा, राम मंदिर भी बन जाएगा हे सगळं खरं आहे, पण यातलं “हमारे देश का हर व्यक्ती अगर ठानले’’ हीच तर अशक्य गोष्ट आहेना, आणि इथेच तर खरी गोम आहे. अहो एका पक्षात कशाला एका कुटुंबातसुद्धा सगळ्यांचे अनेक मुद्यांवर एकमत नसते. इथे तर सवासौ करोड लोगों की बात आहे. सगळे लोक जर एका विचाराची असती तर आपला देश किंवा अन्य कोणताही देश मुंग्यांच्या वारुळासारखा झाला असता. तसं नसतं म्हणून तर हे एवढे राजकारण आणि चांगला नेता व पक्षाच्या शोधात जनता असते. आणि अशा शोधातून मोदी व त्यांच्या पक्षाला निवडून दिले.

आता दुसरे एक बघा. मोदी सरकारला वर्ष, दोन वर्षे पूर्ण झाल्यापासून त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे की “हमारे सरकार का एक भी भ्रष्टाचार का मामला विरोधी नही निकाल पाये’’. (भक्त मंडळी लगेच “मोदी…. मोदी…. मोदी’’ असा गजर करायला मोकळी) आता या वाक्यावरसुद्धा हसू येणं मी टाळू शकत नाही. म्हणजे माझ्या हाती भ्रष्टाचाराचे चार पुरावे आले आहेत म्हणून मी हसतोय असे नाही. तर अहो ही काय भाषा झाली?

उदाहरणार्थ, आता आपण सगळे जण आपल्या मुलीसाठी स्थळ बघताना ‘मुलगा, चांगला, देखणा, हुशार, श्रीमंत असावा, पण बाहेर लफडी करणारा नसावा’ अशीच अपेक्षा ठेवतो. त्यानुसारच आपण मुलाची माहिती काढतो व शुभमंगल लावून देतो. आता एक वर्षांनी लग्नाच्या वाढदिवशी जर नवरा मुलगा सासू-सासऱ्यांना “माझी अजून एकही भानगड तुम्हाला सापडलेली नाही’’ असे म्हणून जर वाकुल्या दाखवू लागला तर कसे वाटेल? लोकं त्या नवऱ्याला सांगतील की बाबा रे नवरा-बायकोने एकमेकाशी एकनिष्ठ राहणे हे आपण गृहीतच धरतो. त्यात बोंब मारून सांगण्यासारखे काही नाही. हां पण जर नवऱ्याने इतर लफडी केली तर मात्र मुलगी नाइलाजास्तव घटस्फोट घेते. असाच घटस्फोट जनतेने कॉंग्रेसला दिला. असो! तर “आम्ही अजून भ्रष्टाचार केलेला नाही’’ अशी सारखी आरोळी पिटल्यावर माझ्यासारख्याला हसतानादेखील नको ती शंका येणे स्वाभाविक आहे.

आता गेल्या महिन्यात गोव्यात भाषण करताना मात्र मोदीजी भावूक झाले आणि मी देशासाठी केवढा त्याग केला असं ते सांगू लागले. आता पूर्वी सोनिया गांधी या नेहमी, इंदिराजी, राजीवजी यांची आठवण करून आमच्या घराण्याने देशासाठी त्याग केला असे म्हणत. ते काही अंशी खरेही आहे आणि त्या अनुकंपेमुळे किंवा सिम्पथीमुळे लोकांनी त्यांना निवडून देऊन राज्य त्यांच्या हातात दिले हेही तितकेच खरे. आता ते लक्षात घेऊन मोदीदेखील मी देशासाठी त्याग केला असे म्हणू लागले. (भक्त मंडळी लगेच काही क्षण गंभीर झाली, पण लगेच स्वतःला सावरून “मोदी…. मोदी…. मोदी’’ असा गजर करायला मोकळी झाली) आता मला मात्र पुन्हा हसू आले. (माझा स्वभावच विचित्र असल्यामुळे असेल कदाचित, पण हसू आले हे खरे, मला एखाद्या सायकियाट्रिस्टला भेटायलाच हवे!) आता मी लहानपणी शाळेत असताना विनोबा भावेंचा “त्याग और दान’’ नावाचा धडा वाचला होता. मोदींच्या तो वाचनात आला नसावा. आता मी त्याग केला असे मोदींनी म्हणण्याऐवजी त्यांच्या एखाद्या भक्ताने ते म्हणायला हवे होते, पण भक्तांना मोदींच्या सक्सेस स्टोरीत कुठेही त्याग दिसला नाही, मलासुद्धा तो दिसत नाही. त्यामुळे अंधभक्तीने झाकोळल्या गेलेल्या भक्तांना काही कुणाला हे सुचले नसावे मग काय मोदींनीच स्वतःच्या आवाजात अधिक कंप आणून मी देशासाठी त्याग केला असे सांगून टाकले.

आता त्यागाच्या गोष्टी कोणी कराव्यात?

लो. टिळक, म. गांधी, पं नेहरू, आदी उच्चविद्याविभूषित नेत्यांनी जर ब्रिटिश सरकारचे लांगुलचालन केलं असतं तर त्यांना सर्व सुखे हाताशी होती. अशा मंडळींनी ती लाथाडून अनेक वर्षे तुरुंगवास स्वीकारला. नेताजी सुभाषचंद्र बोस, ते तर त्या काळचे ICS अधिकारी म्हणजे राजाच होते, पण ते सोडून ते अज्ञातवासात गेले, स्वा. सावरकरांचा तुरुंगवास म्हणजे नरकवासच होता. (एका विकृत काँग्रेसी नेत्याने अंदमानातील त्यांचे नाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अर्थात मोदी सरकार येताच तो विकृतपणा मात्र लगेच बंद झाला.) भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान, तर अशा शेकडो जणांच्या त्यागावर आपला देश उभा आहे. तर त्यागाच्या गोष्टी त्यांच्यासंबंधात कराव्यात. आता मोदींनी तसे काय केले आहे?

ते अहमदाबादमध्ये चायवाले होते, (कुणी त्यांच्या हातचा चहा प्यायल्याचे सांगत नाही, पण तसे मोदींनीच सांगितले म्हणून समजले) आता पुढे ते संघात गेले, लग्न केले. तीनएक वर्षांचा संसार केल्यावर घरदार सोडून ते हिमालयात गेले म्हणे. ते अतिशय चांगले कार्यकर्ते आणि वक्ते असल्याने RSS मध्ये मात्र त्यांचे चांगले करीअर घडले ते आपण सगळे जाणतोच. आता यात त्यांचे गुण निश्चित दिसतात, पण त्याग कुठे आला?

आता आमच्या घरी काम करणारी बाई आहे, झाडूपोछा, धुणे, भांडी सर्व कामे ती चांगले करते, तिला आम्ही पगारही चांगला देतो, पण जर का ती दिवाळीचा बोनस घेता घेता एकदम गहिवरून आली आणि मी तुमच्या घरासाठी त्याग केला असे जर म्हणू लागली, तर मला एकदम काय वाटेल, तसेच मला मोदींचे ते वाक्य ऐकून वाटले.

असो! पण मी मुळात नाट्यशास्त्रचा विद्यार्थी आहे, त्यांच्या आवाजातील तो कंप ऐकून ओळखले की ते छानसा अभिनय करताहेत, पण मोदीभक्त मंडळींनी नाट्यशास्त्राचा अभ्यास केलेला नसल्याने ते लगेच काही क्षण गंभीर झाले, पण नंतर स्वतःला सावरून “मोदी…. मोदी…. मोदी’’ असा गजर करायला मोकळी झाली. मी मात्र हसण्यापेक्षा जास्त काही करू शकत नव्हतो.

(लेखक दूरदर्शनचे निवृत्त संचालक आहेत.)