
रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या वाहनाचा जाणीवपूर्वक अपघात घडवून त्यांची हत्या करण्यात आली. हा कट पूर्वनियोजित होता का आणि इतर गोष्टी तपासण्यासाठी पोलीस उपअधीक्षकांच्या अधिपत्याखाली एसआयटी चौकशी सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री, गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली.
रत्नागिरीतील राजापूर तालुक्यामध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाविरोधात पत्रकार शशिकांत वारिशे यांनी ‘महानगरी टाइम्स’ या वर्तमानपत्रात आरोपीविरुद्ध बातमी प्रकाशित केली होती. त्या गोष्टीचा राग मनात ठेवून नाणार परिसरात 6 फेब्रुवारीला जाणीवपूर्वक वारिशे यांच्या दुचाकीला पाठीमाग्नू ठोकून हत्या घडवून आणली, अशी कबुली आरोपीने दिली आहे. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल करून आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास 11 फेब्रुवारीपासून एसआयटीकडून करण्यात येत असून त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती गृह मंत्री फडणवीस यांनी लेखी स्वरूपात सभागृहात सादर केली. वारिशे हत्या प्रकरणात अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण, सचिन अहिर, सुनील शिंदे, विलास पोतनीस, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.