वातावरणातील बदल जाणून पत्रकारांनी जनप्रबोधन करावे-पी.साईनाथ

383

ग्लोबल वॉर्मिग सारख्या कारणामुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचा पत्रकारांनी अभ्यास करावा आणि तो बदल हाताळण्याबाबत त्यांनी जनप्रबोधन करावे आणि समाजाच्या जाणिवा जोपासाव्यात, असे मत सुप्रसिध्द पत्रकार आणि समाज कार्यकर्ते पी.साईनाथ यांनी नांदेड येथे सांगितले.

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या व्दैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा हे होते. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील, स्वागताध्यक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार सूर्यकांता पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापौर सौ.दीक्षा धबाले, जि.प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, झी न्यूजचे संपादक प्रसाद काथे आदी उपस्थित होते.

पी.साईनाथ पुढे म्हणाले की, वातावरणातील बदल किंवा हवामानात, पावसाच्या प्रमाणात होणारा बदल ग्रामीण पत्रकारच जास्त प्रभावीपणे पाहू शकतो व त्याचे वार्तांकन करु शकतो. कारण त्याचा संबंध शेती करणाऱ्या व मातीशी नाते असलेल्या शेतकऱ्यांशी असतो. म्हणून पत्रकारांनी शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवनातला बदल सूक्ष्मपणे टिपला पाहिजे व त्याची कारणे शोधून जनतेचे प्रबोधन केले पाहिजे. वातावरणातील बदल हे पत्रकारांपुढचे मोठे आव्हान आहे, असेही पी.साईनाथ म्हणाले.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून त्यामुळे मुंबईच्या समुद्रातील मासे स्थलांतर करीत आहेत व वाढत्या तापमानामुळे मासे मरत आहेत. ग्लोबल वॉर्मिगचे प्रमाण वाढत गेले तर शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील होईल असेही ते म्हणाले.

शेतीसाठी वापरण्यात येणारी रासायनिक खते यामुळे ही शेतीवर विपरीत परिणाम होत असून पीके घेण्याबाबतही शेतकऱ्यांचे प्रबोधन केले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, जास्त पाण्ीा लागणारी पीके टाळली पाहिजेत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व फलोत्पादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. आपल्या भाषणात त्यांनी पत्रकारांचे प्रश्न गंभीर आहेत. सभागृहात झालेल्या पत्रकारांच्या हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, त्यांच्या अनेक समस्या आहेत, परिषदेत झालेल्या ठरावांची यादी आपण आमच्याकडे पाठवा, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही व्यासपीठावरील सर्व मंडळी निश्चितपणे प्रयत्न करु. वस्तूनिष्ठ बातम्या पाठविणे हे पत्रकारांचे काम आहे. चुकीच्या पध्दतीने आलेल्या बातमीचा वेगवेगळ्या चॅनलवर व काही वर्तमानपत्रात खुलासाही होत नाही. त्यामुळे विश्वार्हता जपली पाहिजे. राज्यभरातील पत्रकार अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र येतात, त्यावेळी विविध प्रश्नांचा उहापोह झाला पाहिजे. सामाजिक भावना, सामाजिक प्रश्न, वेगवेगळ्या समस्या यासंदर्भात पत्रकारांनी जागरुकपणे लिखाण केले पाहिजे. पत्रकार हा जनमानसाचा आरसा आहे,  त्यानेही जबाबदारीने वागले पाहिजे. समाजाप्रमाणे त्यांचेही प्रश्न गंभीर असून, ते सोडविण्याचा आपण नेटाने प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.

अधिवेशनाच्या एकंदरच आयोजनाबद्दल कौतुक करुन त्यांनी याअधिवेशनातील दोन दिवसांचे विचारमंथन निश्चितच सर्वांना उपयोगी पडेल. तुमच्या सर्व प्रश्नांसंदर्भात मी तुमच्या पाठिशी आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

स्वागताध्यक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या विविध प्रश्नासंदर्भात आपण त्यांच्या सोबत राहणार असून  नांदेडच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मला मिळाले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. समाज मनाचा आरसा आणि जनतेचे प्रश्न वृत्तपत्रांच्या माध्यमातून लावून धरले पाहिजे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या भाषणात पत्रकार आणि राजकारणी यांची एकमेकांची नाळ जुळलेली आहे. आमच्या  विविध विकासाच्या संदर्भातील बातम्या, वेगवेगळे कार्यक्रम याची प्रचिती ते नेहमीच लिहित असतात. काहीवेळा खटकेही उडतात, मात्र त्यामुळे कटूता निर्माण होऊ नये, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी माजी मंत्री सूर्यकांता पाटील, परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, विश्वस्त एस.एम.देशमुख, पत्रकार विजय जोशी, आमदार डी.पी. सावंत यांचेही भाषणे झाली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, सचिव सुभाष लोणे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाश कांबळे, रविंद्र संगनवार, लक्ष्मण भवरे तसेच जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या