राजस्थानचे भाजप अध्यक्ष, खासदार मदनलाल सैनी यांचे निधन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजस्थान भारतीय जनता पक्षाचे प्रमुख, विद्यमान खासदार मदनलाल सैनी यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 75 वर्षांचे होते. खासदार मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे मंगळवारी राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

मदनलाल सैनी यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब होती. उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही त्यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली होती. अखेर सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सैनी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मदनलाल सैनी यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात राजस्थान भाजपाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली होती. वसुंधरा राजे यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होत होता. 1952 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. एबीव्हीपीचे प्रदेश मंत्रीपदही त्यांनी भूषवले होते.